वायुदलाच्या वीस हवाईतळांवर लवकरच अत्याधुनिक ‘मॅफी’ यंत्रणा Print

लोहगाव हवाईतळावर डिसेंबपर्यंत कार्यान्वित
प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून येत्या काही महिन्यांत निवडक वीस हवाईतळांवर लढाऊ विमानांना जमिनीवर उतरवण्यासाठी मार्गदर्शन करणारी ‘मॉडर्नायझेशन ऑफ एअरफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ (मॅफी) ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामध्ये लोहगाव येथील वायुदलाच्या तळाचाही समावेश आहे, अशी माहिती वायुदलाच्या पुणे तळाचे प्रमुख एअर कमोडोर व्ही. ए. चौधरी यांनी बुधवारी दिली.
वायुदलाच्या ८० व्या वर्धापण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वाहतूक जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे उपस्थित होते.
चौधरी म्हणाले की, देशात सध्या पंजाबमधील भटिंडा येथे प्रायोगिक तत्त्वावर मॅफी ही अत्याधुनिक यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आली आहे. लवकरच देशातील वीस केंद्रांवर ती बसवली जाईल. लोहगाव विमानतळावर ती डिसेंबर महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल. या यंत्रणेमुळे लढाऊ विमानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि विमाने जमिनीवर येताना त्याना योग्य दिशा दाखविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असणार आहे. या यंत्रणेबरोबरच हवाईतळाचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सध्या वायुदलाचा रनवे आठ हजार तीनशे मीटर आहे. त्याचा विस्तार आणखी सातशे ते आठशे मीटरने वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या वाढीव रनवेसाठी वीस एकर जागा संपादित केली असल्याचे त्यांनी सांगितले.     
अनधिकृत बांधकामांचा प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८)
सामोपचाराने सोडवणार
वायुदलाच्या हद्दीत शंभर मीटपर्यंत कोणत्याही बांधकामांना आणि पाचशे मीटपर्यंत चार मजल्यांपेक्षा जास्त बांधकामांना परवानगी नाही. मात्र, सध्या वायुदलाच्या तळाजवळ मोठय़ा इमारती उभारल्या जात आहे. तसेच जागेवर अतिक्रमण वाढत असून याबाबत राज्य शासन व महापालिका यांना कळविण्यात आले आहे. याबाबत वायुदलास गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत, असे वायुदलाच्या पुणे तळाचे प्रमुख एअर कमोडोर व्ही. ए. चौधरी यांनी सांगितले.