आणखी तीन मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र बससेवा Print

प्रतिनिधी
शहरात आणखी तीन मार्गावर पीएमपीतर्फे महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू होत असून या सेवेचे उद्घाटन महापौर वैशाली बनकर आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी चार वाजता स्वारगेट येथे केले जाणार आहे.
हडपसर ते स्वारगेट, कात्रज ते स्वारगेट आणि धायरी ते स्वारगेट या तीन मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र सेवा सुरू केली जाणार आहे. महिलांची मागणी विचारात घेऊन कात्रज ते शिवाजीनगर आणि हडपसर ते पुणे स्टेशन या दोन मार्गावर पीएमपीतर्फे सकाळी व सायंकाळी महिलांसाठी स्वतंत्र गाडय़ा सोडल्या जातात. या सेवेचा आता विस्तार केला जाणार असून शहरात आणखी तीन मार्ग सुरू केले जाणार आहेत. पुण्यात मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात उपस्थित राहिलेल्या युवतींनी पीएमपीमध्ये होणाऱ्या छेडछाडीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी मी स्वत: या प्रश्नात लक्ष घालून गृहमंत्र्यांशी आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीन असे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.
महिलांसाठी सुरू केल्या जाणाऱ्या या स्वतंत्र गाडय़ांचे उद्घाटन समारंभपूर्वक केले जाणार आहे. महापौरांसह महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक तसेच पीएमपीच्या संचालकांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल.