दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून Print

प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) गुरुवारपासून (४ ऑक्टोबर) सुरू होत असून यावर्षी परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
राज्यभरात दहावीची परीक्षा ४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, तर बारावीची परीक्षा ४ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षेच्या कालावधीमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांच्या दोनशे मीटरच्या परिसरात फक्त विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरात मोबाईल, कॅमेरा यांनाही बंदी करण्यात आली आहे. या वर्षीही परीक्षा केंद्रांच्या परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
या वर्षी राज्यभरातून दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख २३ हजार २५८ विद्यार्थी बसणार आहेत, तर बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख ८९ हजार १२९ विद्यार्थी बसणार आहेत. राज्यातील एकूण १५ हजार ६२१ माध्यमिक शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांनी, तर ६ हजार १४४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात एकूण ९०२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.