तीस हजार चौरसफूट बांधकाम पाडले Print

धनकवडीसह गोखलेनगर, खराडीतही पालिकेची कारवाई
प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

बांधकाम सुरू असलेल्या बेकायदा इमारतींवरील कारवाईच्या तिसऱ्या दिवशी; बुधवारी धनकवडीसह गोखलेनगर आणि खराडी भागातही कारवाई करण्यात आली. दिवसभरात १८ इमारतींचे ३० हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. गोखलेनगर येथे कारवाईला विरोध झाल्यामुळे पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेऊन कारवाईनंतर सोडून दिले. कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा बांधकामाचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कारवाईची एकत्रित माहिती अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. धनकवडी सर्वेक्षण क्रमांक ३४, २६, ३७, ३८ आणि सर्वेक्षण क्रमांक २, जीवनधारानगर येथे मंगळवारी कारवाई करण्यात आली. या भागातील आठ बांधकामे पाडण्यात आली. येथील नऊ हजार ५५० चौरसफूट बांधकाम बुधवारी पाडण्यात आले. यातील बहुतेक बांधकामे दुमजली होती. विशाल हरिभक्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली. खराडी, चंदननगर भागात सर्वेक्षण क्रमांक ४८ येथील एक तीन मजली इमारत पाडण्यात आली. येथे सहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले होते. याच भागात सर्वेक्षण क्रमांक १४ थिटे वस्ती येथील तीन मजली, चार हजार चौरस फुटांची इमारतही पाडण्यात आली. या भागातील १० हजार चौरस फूट बांधकाम दिवसभरात पाडण्यात आले, असे खरवडकर यांनी सांगितले.
गोखलेनगर, जनवाडी येथील कारवाईला सुरुवात होण्यापूर्वी स्थानिक नागरिक तसेच आजी-माजी नगरसेवकांनी कारवाईला विरोध केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ज्या भागात कारवाई केली जाणार होती, तेथे पोलिसांनी नाकाबंदी केली. तसेच पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतल्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. या भागात तळमजला अधिक दोन मजले अशा स्वरूपाचे बांधकाम करण्यात आले होते. अशाप्रकारचे बांधकाम केलेल्या आठ घरांवर कारवाई करण्यात आली. या सर्व घरांचे वरचे दोन मजले पाडण्यात आले. येथील दहा हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.
फौजदारी गुन्हे दाखल करणार
गेले तीन दिवस ज्या ज्या ठिकाणी कारवाई करून बांधकामे पाडण्यात आली आहेत, अशा ठिकाणी पुन्हा बांधकामाचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशीही माहिती खरवडकर यांनी दिली.
पूरग्रस्त वसाहतींना राज्य शासनाने दोन एफएसआय लागू केला असून गोखलेनगर भागातील इमारतींचाही विचार दोन एफएसआयनुसार करावा, अशी मागणी येथील नगरसेवकांनी महापालिका आयुक्त महेश पाठक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. तसेच तळजाई परिसरातील रहिवाशांनीही आयुक्तांची भेट घेऊन या भागात पूर्वी एक एफएसआयनुसार बांधकामांना परवानगी होती. मात्र, आता येथील एफएसआय वाढला असून त्याचा विचार करावा, अशी मागणी केली.