संक्षिप्त Print

डॉ.वि.वि.घाणेकर यांना ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’
महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ज्ञ डॉ.वि.वि.घाणेकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. डॉ.घाणेकर यांनी व्यसनमुक्तीसाठी प्राध्यापक, विद्यार्थी, कार्यकर्ते यांच्या प्रबोधनाचे काम केले आहे. तसेच, व्यसनमुक्तीवर आधारित अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. तसेच त्यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एज्युकेशन, पुणे कन्झ्युमर्स गाईड्स सोसायटी, श्री हरीकीर्तनोत्सव, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा विविध संस्थांमध्ये विश्वस्त व पदाधिकारी म्हणून काम केले आहे.
‘द ओशन सेव्हर्स ऑफ इंडिया’ची मोहीम
इंडियन मरिटाइम फाउंडेशनच्या ‘द ओशन सेव्हर्स ऑफ इंडिया’(ओएसआय) तर्फे येत्या शनिवारी ६ ऑक्टोबर रोजी ‘इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप पुणे चॅप्टर २०१२’ मोहीम राबविण्यात येत आहे. एस.एम.जोशी पुलाजवळील नदीपात्राच्या साफसफाईने या मोहिमेला सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे, अशी माहिती ओएसआयचे उपाध्यक्ष कर्ण रगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एस.एम. जोशी पूल, म्हात्रे पूल, औंध पूल, कल्याणीनगर पूल, राजाराम पूल आदी वीस पुलांसह नदीपात्रांची साफसफाई या दिवशी केली जाणार आहे. या मोहिमेत एनडीए, विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, लायन्स क्लब, रोटरी क्लब, इंटरव्हील क्लब आणि शहरातील इतर स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. सहभागी स्वयंसेवकांना वॉशिंग्टन संस्थेतर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी कर्ण रगडे (९५४५९३९५२४) यांच्याशी संपर्क साधावा.
‘बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज’चा ‘मूक मोर्चा’
दैनंदिन कामकाजाचे आऊटसोर्सिग व कंत्राटीकरण थांबवणे, व्यवस्थापनाच्या विविध स्तरांवर बिझिनेस डेव्हलपमेंट फोरमची स्थापना करणे, सर्व अंशकालीन स्वीपर्सना पूर्णवेळ सबस्टाफपदी बढती देणे, अशा मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने संपूर्ण कार्यकारिणीसह बाजीराव रोड शाखा ते लोकमंगल ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. याचबरोबर ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान ‘स्वाक्षरी मोहीम’ राबविण्यात येणार आहे. देशभरातील कर्मचारी मागण्यांचे बॅचेस लावून १३ ऑक्टोबर रोजी ‘मागणी दिवस’ पाळणार असून लोकमंगलसमोर एकत्रित निदर्शने करणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे २५ ऑक्टोबर रोजी देशव्यापी संप पुकारला जाणार आहे.
महिला बचत गटाचे खादी ग्रामोद्योग प्रदर्शन
गांधी सप्ताह निमित्त कोथरूडमधील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, न्यू इरा फाउंडेशन आणि जागृती बचत गट यांच्या वतीने महिला बचत गटाच्या खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच झाले.  या वेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, उपाध्यक्ष अन्वर राजन, अ‍ॅड.अभय छाजेड आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन १० ऑक्टोबपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वासाठी खुले राहणार आहे.
‘श्रीं’ ना स्वराभिषेकाचे आयोजन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ‘श्रीं’ ना स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांनी विविध गाण्यांच्या सादरीकरणाने हा स्वराभिषेक केला. त्यांनी शास्त्रीय संगीताबरोबरच अभंग, गवळण, भैरवी अशी विविध  स्वरकला सादर केली. माऊली टाकळकर यांनी टाळांची साथ तर श्रीराम हसबनीस यांनी हार्मोनियम आणि प्रशांत पांडव यांनी तबल्यावर साथ दिली.
दुष्काळग्रस्तांना मदत
प्रियदर्शनी सेवा संस्था आणि क्रीडा प्रबोधिनी या संस्थेचे सचिव विराज सोंडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द केला. सोंडकर यांनी नुकताच हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हा धनादेश दिला. या वेळी संस्थेचे संस्थापक अनिल सोंडकर, सुनील सोंडकर, मयूर नागरे, दिलीप सातकर, शिरीष मोहिते, अनिकेत फुले आदी  उपस्थित होते.