मंगळमोहिमेचा आनंद प्रतिकृतीद्वारे! Print

ज्योतिर्विद्या प्रतिसंस्थेद्वारे प्रदर्शन
 प्रतिनिधी
मंगळावर उतरलेले ‘मार्स क्युरिओसिटी प्रोब’ हे वाहन आणि त्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्याबाबतचे प्रदर्शन ज्योतिर्विद्या प्रतिसंस्थेद्वारे येत्या शनिवार-रविवारी (६ व ७ ऑक्टोबर) पुण्यात घोले रस्त्यावरील महापालिकेच्या न्यू आर्ट गॅलरीत भरणार आहे.
हे प्रदर्शन दिवसभर म्हणजे सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळात सर्वासाठी खुले राहणार आहे. त्याचे प्रवेशमूल्य नागरिकांसाठी १० रुपये, तर विद्यार्थ्यांसाठी ५ रुपये असेल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. विद्यार्थी व नागरिकांपर्यंत आतापर्यंतच्या मंगळमोहिमांची माहिती पोहोचावी हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. या प्रदर्शनात मंगळावरील आतापर्यंतच्या सर्व ७ मोहिमांची त्रिमिती (थ्री-डी) मॉडेल्स मांडण्यात येणार आहेत. प्रमुख आकर्षण असेल ते नुकतेच मंगळावर उतरलेल्या ‘क्युरिओसिटी प्रोब’ या वाहनाची हालती प्रतिकृती! हे वाहन मंगळावर कसे चालते आणि मंगळाबाबतची माहिती पृथ्वीवर कशा प्रकारे पाठवते हेही त्यात पाहायला मिळेल. याशिवाय मंगळमोहिमांबाबत २० मिनिटांचे सादरीकरणही दाखविण्यात येणार आहे.