विद्यापीठाची मार्चमधील अधिसभा मुख्य इमारतीत होणार? Print

प्रतिनिधी
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाची गुरूवारी पाहणी केली असून मार्च महिन्यातील अधिसभा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. विविध कारणांमुळे मुख्य इमारतीचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. आता हे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. याबाबत बोलताना डॉ. गाडे यांनी सांगितले, ‘‘येत्या दहा ते अकरा महिन्यांमध्ये मुख्या इमारतीच्या नूतनीकरणाचे सगळे काम पूर्ण होईल. ही इमारत ऐतिहासिक वारसा असल्यामुळे त्याचे काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागत आहे. काम उत्तम दर्जाचे व्हावे असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. मुख्य इमारतीतील विविध विभागांचे काम पूर्ण होत आले आहे. डिसेंबर महिन्यात होणारी व्यवस्थापन परिषदेची बैठक मुख्य इमारतीमध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मार्च महिन्यामध्ये होणारी अधिसभाही मुख्य इमारतीमध्ये करण्याचा प्रयत्न आहे.’’