पुणे महापालिकेकडे अवघे तेहेतीस बांधकाम निरीक्षक Print

प्रतिनिधी
शहरात वीस हजार फुटांच्या आतील बांधकामांना परवानगी देणे आणि या आकारमानाची बेकायदा बांधकामे थांबवणे, तसेच त्यांच्यावर कारवाई करणे हे अधिकार क्षेत्रीय कार्यालयातील बांधकाम निरीक्षकांना असले, तरी संपूर्ण शहरासाठी महापालिकेकडे अवघे ३३ बांधकाम निरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील बेकायदा बांधकामांवर गेले चार दिवस धडक कारवाई सुरू असून उपनगरांमध्ये ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे अशा इमारती सध्या पाडल्या जात आहेत. ही कारवाई मोठय़ा प्रमाणात सुरू असली, तरी मुळात चार-चार, पाच-पाच मजली इमारती उभ्या राहीपर्यंत महापालिकेचे अधिकारी काय करत होते, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ज्या ज्या भागात अशी बेकायदा बांधकामे झालेली आहेत त्या त्या भागांमध्ये अनधिकृत कामांवर लक्ष ठेवणारी महापालिकेची यंत्रणा नव्हती का, असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बांधकाम निरीक्षक म्हणून फक्त ३३ अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील २० हजार चौरसफुटांच्या आतील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार या निरीक्षकांना आहेत. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात जेथे कोठे बेकायदा बांधकाम सुरू असेल ते थांबवण्यासाठीची आवश्यक कारवाई करणे, अशी बेकायदा बांधकामे पाडणे, आवश्यक तेथे कायदेशीर कृती करणे हे कामही याच निरीक्षकांकडे आहे.
पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि वाढत असलेली लोकसंख्या पाहता ३३ ही निरीक्षकांची संख्या अतिशय अपुरी असून गेली २० वर्षे ही संख्या कायम आहे. शहर दुपटीने वाढले तरी ही संख्या २० वर्षे कायम असल्यामुळे शहरातील बेकायदा बांधकामे फार मोठय़ा वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. सध्याचा विचार केला, तर या निरीक्षकांची संख्या ८० पर्यंत वाढविणे ही तातडीची गरज आहे. या निरीक्षकांबरोबरच २० हजार चौरसफुटांवरील बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिका भवनातील अधिकाऱ्यांकडे आहेत आणि अशी मोठी बांधकामे जेथे बेकायदा पद्धतीने उभी राहात असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचेही अधिकार या अधिकाऱ्यांकडे आहेत. तसेच अशी बांधकामे त्यांच्या कार्यक्षेत्रात उभी राहणार नाहीत, हे पाहण्याचे
कामही याच अधिकाऱ्यांकडे आहे. मात्र, या अधिकाऱ्यांचीही संख्या अपुरी असल्याचे सांगण्यात आले.
इमारत निरीक्षकांची ही संख्या अतिशय अपुरी असली, तरीही ही संख्या वाढविण्यासाठी देखील गेल्या कितीतरी वर्षांत प्रयत्न झालेले नाहीत.