दुधाच्या खरेदीदरामध्ये वाढ करण्याची मागणी Print

प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पशुखाद्य आणि चाऱ्याच्या दरामध्ये झालेली वाढ, जनावरांची दूध देण्याची कमी झालेली क्षमता, मध्यस्थांची कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे दूध उत्पादकांना दूध धंदा परवडत नाही. त्यामुळे दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याची मागणी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने केली आहे. गायीच्या दुधामध्ये प्रतिलिटर तीन रुपये तर, म्हशीच्या दुधामध्ये प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी केली आहे.
बाळासाहेब खिलारी म्हणाले, उच्च प्रतीच्या ५० किलो पशुखाद्याचा सध्याचा दर ९०० रुपये म्हणजेच एका किलोला १८ रुपये असा आहे. सध्या गायीच्या दुधाचा खरेदी दर १७ रुपये तर, म्हशीच्या दुधाचा खरेदी दर २५ रुपये प्रतिलिटर आहे. म्हणजेच दुधापेक्षाही अधिक दर पशुखाद्याला द्यावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. चाऱ्याच्या वाढत्या किमतीमुळे दूध उत्पादकांना हा धंदा परवडेनासा झाला हे वास्तव आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे प्रोसेसिंग करणाऱ्या प्लँटसाठी अडचणीचे झाले आहे. मध्यस्थांची देखील कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रतिलिटर तीन रुपये तर म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर चार रुपये वाढ करावी अशी मागणी दुग्धविकासमंत्री मधुकर चव्हाण आणि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास गायीचे दूध ३४ रुपये आणि म्हशीचे दूध ४५ रुपयांमध्ये उपलब्ध होईल.