ऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी! Print

आणखी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

विशेष प्रतिनिधी
ऑक्टोबरच्या पहिल्या चारच दिवसांमध्ये पुण्यात तब्बल १०० मिलिमीटर पाऊस पडला असून, त्यामुळे पुण्याच्या पावसाच्या आकडेवारीत लक्षणीय भर पडली आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता पुढील दोन दिवसांतही जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांप्रमाणे गुरुवारी दुपारीसुद्धाजोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. शहराच्या विविध भागांत दुपारी दीड ते चारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात हा पाऊस पडला. त्याची नोंद ३३.४ मिलिमीटर इतकी झाली. या पावसाचा झपाटा खूपच मोठा होता. या पावसामुळे पुण्यात गेल्या चार दिवसांत पडलेल्या एकूण पावसाची नोंद १०० मिलिमीटर इतकी झाली आहे. पुण्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये एकूण ३६७.७ मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्यानंतरच्या चारच दिवसांत १०० मिलिमीटर पाऊस झाल्याने पुण्यात पडलेल्या पावसाचा आकडा वाढला आहे. असा जोरदार पाऊस पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्येही झाला नाही. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळे पुण्यात हा पाऊस पडत असून, पुढील दोन दिवसांतही अशाच पावसाची शक्यता आहे.