संक्षिप्त Print

संतोष वळसे पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार संतोष वळसे पाटील यांना नुकताच देण्यात आला. प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वळसे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम आणि समाजव्यवस्था यावर वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन केले आहे.
सुरेश भुजबळ यांना ‘वृत्तभूषण’ पुरस्कार
बेल्हे येथील पत्रकार सुरेश भुजबळ यांना राज्यस्तरीय ‘वृत्तभूषण’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते हा पुरस्कार भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. या वेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सुधाकर गणगणे, उद्योजिका कल्पना सरोज, अनिल अहिरे आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी सामाजिक समस्या, व्यसनमुक्ती, बिबटय़ांमुळे निर्माण झालेली समस्या व त्यावरील उपाय, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांवर सात्यत्याने लिखाण केले. तसेच वन्यप्राणी व ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व पटवणाऱ्या बातम्या लिहून वेळोवेळी जनजागृतीही केली.
डॉ. एकनाथ खेडकर अधिष्ठातापदी
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन या विद्याशाखेच्या अधिष्ठाता (डीन) पदावर नुकतीच डॉ. एकनाथ खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. खेडकर हे सध्या डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथे संचालक पदावर कार्यरत आहेत. तसेच असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एम.बी.ए / एम.एम.एस इन्स्टिटय़ूट या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
‘एन्कॉन पुरस्कारां’चे वितरण
ऊर्जा संवर्धनाच्या प्रचारासाठी किलरेस्कर ब्रदर्स लिमिटेड च्या वतीने ‘एन्कॉन पुरस्कारां’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी ऊर्जा संवर्धनासाठी २०१२ मध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कंपन्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. किलरेस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड ला ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट’ या पुरस्काराने, तर द कोल्हापूर स्टील कंपनीला ‘हाइएस्ट रिटर्नस् ऑन इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनचे अध्यक्ष डॉ.प्रमोद देव, किलरेस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक आर.आर.देशपांडे आदी उपस्थित होते.   
‘कॅनडातील उच्च शिक्षण संधीविषयी परिसंवाद
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व कॅनडातील डग्लस कॉलेज यांच्यामध्ये झालेल्या करारांतर्गत गरवारे कॉलेज कॉमर्स तर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘कॅनडातील उच्च शिक्षण संधी’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात कॅनडात राहून शिकण्याची व नोकरी करण्याची संधी कशाप्रकारे उपलब्ध होईल याविषयी माहिती देण्यात आली. कॅनडामध्ये मोठय़ाप्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता भेडसावत आहे. अशावेळी भारतीय तरुणांना तेथे राहून शिकण्याची व काम करण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मत डग्लस कॉलेजचे मार्केटिंग हेड ख्रिस्चन बर्नाड यांनी व्यक्त केले.
‘आर्टिस्ट्री’च्या प्रदर्शनाचे उद्घाटन
‘आर्टिस्ट्री’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट, आर्टिस्ट्रीच्या संचालिका वीणा गोखले आदी उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या जीवनातील गरजा कमी करुन नवीन जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे मत डॉ. अवचट यांनी या वेळी व्यक्त केले. या प्रसंगी लोकसाधन, आपलं घर, लुईब्रेल अंध-अंपग संस्था, स्नेहालय आदी निमसरकारी व सेवाभावी अशा ५० संस्थांनी आपल्या कार्याची माहिती लोकांसमोर मांडली.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा सन्मान
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या स्कोच संमेलनामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाला ‘अभिनव शहरी वित्तीय समावेशन क्रियान्वयन मॉडेल’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या शहरी वित्तीय समावेशन मॉडेलची सुरूवात प्रायोगिक तत्त्वावर दिल्ली येथे करण्यात आली असून काही काळाने देशातील सर्व शहरांमध्ये हे मॉडेल कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी अजय व्यास, अशोक कुमार, समीर कोचर, नंदन निलेकणी, सुश्री कोचर आदी उपस्थित होते.