सराफ व्यावसायिकांचा लाक्षणिक बंद Print

जकात कर्मचाऱ्यांच्या दडपशाहीचा आरोप
  प्रतिनिधी
 महापालिका जकात विभागाचे कर्मचारी दुकानाबाहेर उभे राहून ग्राहकांच्या बॅगा आणि सेल्समनचे खिसे तपासून दडपशाहीचा अवलंब करीत असल्याचा आरोप करून सराफ व्यावसायिकांनी शुक्रवारी लाक्षणिक बंद पुकारला. शहरातील दीड हजार सराफी दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. या संदर्भात पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, जकात विभागाचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून सोन्या मारुती चौक येथील सराफी दुकानाबाहेर थांबत आहेत. शुक्रवारी दुपारी काही कर्मचाऱ्यांनी दुकानामध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांच्या बॅगा तपासल्या. त्याचप्रमाणे दुकानामध्ये काम करणाऱ्या सेल्समनचे खिसे तपासले. ही या कर्मचाऱ्यांची दादागिरी असून ग्राहकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांचा दुकानामध्ये प्रवेश करण्याला विरोध झाला असून त्यामुळे सराफी व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना झाली. वास्तविक जकात विभागाच्या कर्मचाऱ्यांना अशा स्वरूपाची तपासणी करण्याचा कोणताही अधिकार नाही.
 या दडपशाहीच्या निषेधार्थ लाक्षणिक बंद पुकारण्यात आला असून जकात कर्मचाऱ्यांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याददेखील दाखल करण्यात आली आहे.