युरोपिय कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठात नवे अभ्यासक्रम Print

प्रतिनिधी
पुणे विद्यापीठ आता युरोपियन कंपन्यांबरोबर करार करणार असून या कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.
उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या, देशभरातील संशोधन संस्थांच्या सहकार्याने विविध नवे अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवण्याची योजना पुणे विद्यापीठाने आखली आहे. पुणे विद्यापीठ आता दोन युरोपियन कंपन्यांबरोबर सहकार्य करार करणार आहे. या कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठ आता नवे अभ्यासक्रम आणि संशोधन केंद्र सुरू करणार आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेतील नवे अभ्यासक्रम सुरू करण्याात येणार आहेत. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या विषायातील अभ्यासक्रम प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहेत. या शिवाय या कंपन्यांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्पही राबवण्यात येणार आहेत. भारतातील कंपन्या आणि देशपातळीवरील संशोधन संस्थांबरोबरही विद्यापीठ सहकार्य करार करणार आहे. याबाबत डॉ. गाडे म्हणाले, ‘‘परदेशामध्ये कंपन्या, संशोधन संस्था आणि विद्यापीठ संशोधन क्षेत्रात एकत्रितपणे काम करतात. आपल्याकडे मात्र, बहुतेक वेळा हे सगळे घटक आपापल्या पध्दतीने समांतर काम करताना दिसतात. उद्योग क्षेत्रांना विद्यापीठ कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवत असतात. विद्यापीठ, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्र यांनी एकत्रितपणे काम केल्यास उत्कृष्ट प्रतीचे संशोधन होईल. ही तिन्ही क्षेत्रांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पुणे विद्यापीठ करत आहे. त्या दृष्टीने विविध कंपन्या आणि संशोधन संस्थांबरोबर सहकार्य करार करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने सध्या कार्यवाही सुरू आहे. देशभरातील नावाजलेल्या २३ कंपन्यांनी सध्या पुणे विद्यापीठाबरोबर करारबद्ध होण्यासाठी तयारी दर्शवली आहे.’’