विजेचा खेळखंडोबा अन् नागरिकांचे हाल Print

भूमिगत वाहिन्यांबाबत हलगर्जीपणा..
  प्रतिनिधी
पाच दिवसांपासून शहरात दमदार पावसाने हजेरी लावली असतानाच विजेचा खेळखंडोबाही सुरू झाला आहे. भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे शहरभर पसरविण्यात आले असले, तरी रस्त्याचे खोदकाम करणाऱ्या विविध यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे प्रामुख्याने वीज वितरणात बिघाड निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘महावितरण’च्या वितरण व्यवस्थेतील काही त्रुटींप्रमाणेच या वेगवेगळ्या यंत्रणांच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.
पावसाळ्याचे दिवस आले की वीज गायब होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. काही वेळा सुरक्षिततेच्या दृष्टीने वीज बंद केली जाते. मात्र, बहुतांश वेळा यंत्रणेतील बिघाडामुळे वीज जाण्याचे प्रकार होत असतात. जून, जुलै या पावसाच्या महिन्यांमध्ये फारसा जोरदार पाऊस न पडल्याने विजेची समस्या जाणवली नाही. मात्र मागील पाच दिवसांपासून शहरात पडणाऱ्या जोरदार पावसात वीज गायब होण्याच्या तक्रारी शहराच्या विविध भागांतून येत आहेत.
वादळ-वाऱ्यासह पडलेल्या जोरदार पावसामध्ये वीजवाहिन्या तुटून वीज जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. वीजउपकेंद्र, रोहित्रांमध्ये बिघाडही होतात. दुरुस्ती व देखभालीच्या कारणास्तव गुरुवारच्या दिवशी कामे केली जात असताना ऐन गरजेच्या वेळी वीज जाण्याचे प्रकार का होतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याला ‘महावितरण’ची यंत्रणा काही प्रमाणात जबाबदार असली, तरी मागील काही वर्षांमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत.
विजेच्या खांबावरील वाहिन्यांचे जाळे कमी करून शहरातील बहुतांश भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. ही व्यवस्था योग्य असली, तरी विकासकामे करणाऱ्या व प्रामुख्याने विकासकामांसाठी रस्त्याचे खोदकाम करणाऱ्या विविध यंत्रणांचा योग्य समन्वय नसल्याने व त्यांच्या हलगर्जीपणामुळे या वाहिन्यांत बिघाडीचे प्रकार होत आहेत. खोदकाम करताना त्या भागात भूमिगत वाहिन्या असतील, तर संबंधित यंत्रणेने ‘महावितरण’शी समन्वय साधणे गरजेचे असते. बहुतांश वेळा तसे होत नाही. खोदकाम करताना भूमिगत वाहिन्यांवरील कवचाला तडे जातात. वाहिन्या पुन्हा योग्य पद्धतीने पुरल्या जात नाहीत. पावसाळ्यात वाहिन्यांपर्यंत पाणी पोहोचल्यास व हे पाणी चिरलेल्या कवचातून आत गेल्यास छोटा स्फोट होऊन संपूर्ण वाहिनी बंद पडते. वाहिनीतील हा दोष शोधणे अत्यंत किचकट व वेळखाऊ असते. सध्या असेच प्रकार शहरातील विविध भागांत होत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे.