संगीतामुळे मिळाली जीवनाला संजीवनी Print

उस्ताद फैय्याज हुसेन खॉं यांची भावना

प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
भारतीय संगीत हा समुद्र आहे. त्यामध्ये जितके वेळा डुबकी माराल तेवढय़ा वेळेस रत्नेच आपल्या हाती लागतात. संगीत क्षेत्रातील कलाकार हा धनवान असतो. संगीतामुळे जीवनाला संजीवनी मिळाली, अशी भावना ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खॉं यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खॉं यांचा अमृतमहोत्सव आणि गजलगायक उस्ताद अन्वर कुरेशी यांची षष्टय़ब्दीपूर्ती असे दुहेरी औचित्य साधून अरुण म्युझिक क्लासच्या विद्यार्थ्यांतर्फे गरवारे महाविद्यालयाचे सभागृह येथे शनिवारपासून (६ ऑक्टोबर) दोन दिवस सायंकाळी सहा वाजता ‘सूरमयी यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ज्येष्ठ गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खॉं, ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. डी. के. दातार, संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील प्यारेलाल शर्मा, आकाशवाणी दिल्ली केंद्राचे माजी महासंचालक एम. पी. लेले आणि ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्या उपस्थितीत उस्ताद फैय्याज हुसेन खॉं आणि अन्वर कुरेशी यांचा सत्कार होणार आहे.
उस्ताद फैय्याज हुसेन खॉं म्हणाले,‘‘ वडील महंमद हुसेन खॉं यांच्या घरामध्ये माझा जन्म झाला. त्यामुळे संगीत माझ्या रक्तातच आले. संगीतकार हुस्नलाल-भगतराम यांच्यातील पं. हुस्नलाल यांचे आमच्या घरी व्हायोलिनवादन झाले. त्या वेळी आईच्या मांडीवर बसून मी ही मैफल ऐकली होती. तेव्हापासूनच व्हायोलिन या वाद्याची गोडी लागली. पु. ल. देशपांडे, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासह दिग्गज कलाकारांचा सहवास लाभला. सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या सदाशिव पेठेमध्ये १९४० पासून अरुण म्युझिक क्लासची सुरुवात झाली. वडिलांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेण्यासाठी पाठविले. चित्रपट क्षेत्रात काम करायचे तर, आधी शास्त्रीय वादनाची बैठक पक्की असली पाहिजे, या भूमिकेतून पं. रामप्रसाद शर्मा यांच्याकडे व्हायोलिनवादनाचे शिक्षण घेतले. आकाशवाणीच्या सेवेमध्ये खूप चांगली संधी मिळाली. आता युवा कलाकारांना व्हायोलिनवादनाबरोबरच गजलगायकीचे शिक्षण देण्यामध्ये मला आनंद मिळत आहे. कलाकार हा सदैव अतृप्तच असला पाहिजे. जीवनाच्या अखेपर्यंत माझ्या हातून संगीताची सेवा घडू देत हीच इच्छा आहे.’’    
बालगंधर्वानी केले कौतुक
वनिता समाज येथे झालेल्या एका कार्यक्रमात संगीत रंगभूमीचे नटसम्राट बालगंधर्व यांच्यासमोर माझे व्हायोलिनवादन झाले होते. त्या वेळी ‘अपना फैय्याज अच्छा बजाता है’ हे बालगंधर्वानी काढलेले कौतुकाचे बोल मी अजूनही स्मृतींच्या कुपीत जपून ठेवले आहेत. माझे आजोबा, वडील आणि मी, अशा आमच्या तीन पिढय़ातील कलाकारांनी बालगंधर्व यांना व्हायोलिनवादनाची साथ केली आहे.