सहा दशकांच्या लढय़ाचे वर्णन करताना खंडकऱ्यांचे डोळे पाणावले Print

तानाजी काळे / इंदापूर
शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा देण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उठवताच, शेतकऱ्यांना जमिनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अन् यासाठी गेली ६० वर्षे दिलेल्या लढय़ाचा प्रवास कथन करताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. त्यांना पाठिंबा देणारे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हेही या प्रसंगाचे साक्षीदार होते.
१९३५ ते ४० च्या दरम्यान राज्यातील खासगी कारखानदारांनी ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ावर राज्यातील सुमारे ८५ हजार एकर क्षेत्र एकरी २ ते ५ रुपयांच्या भाडेपट्टय़ावर घेतले. कमी भाडेपट्टय़ाच्या करारामुळे पुढील पिढय़ांनी न्याय्य हक्कांसाठी लढा तीव्र केला. १९६१-६२ ला सिलिंग अ‍ॅक्ट आल्यानंतर खासगी कारखानदारांकडील या जमिनी राज्य शासनाकडे आल्या. पुढे शासनाने या जमिनी शेती महामंडळाची स्थापना करून मंडळाकडे वर्ग केल्या. राज्य शासनाने १९७२ साली गरीब व गरजू शेतकऱ्यांना केवळ १५ हजार एकर जमीन परत केली. मात्र, उर्वरीत जमीन शासनाकडेच राहिली. आणि पुन्हा शेतकऱ्यांचा लढा तीव्र झाला..
१९७५ सालापासून हा लढा लढणारे खंडकऱ्यांचे नेते बी. डी. पाटील इंदापूर येथे सांगत होते.. ‘‘लढा सुरू झाल्यापासून इंदापूर तालुक्यातील तत्कालीन नेते (स्व.) शंकररावजी पाटील, स्वातंत्र्यसेनानी माधवराव गायकवाड, त्याचबरोबर नगर जिल्ह्य़ातील विठ्ठलराव विखे पाटील, सोलापूर जिल्ह्य़ातील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनीही या प्रश्नावर प्रदीर्घ लढा दिला. त्यानंतर पुढील पिढय़ातील भूमिपुत्रांनीही लढा सुरू ठेवला. १९९५ ला राज्याच्या हर्षवर्धन पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांनीही या लढय़ाचे गांभीर्य टिकवून ठेवले. आज ६० वर्षांच्या या लढय़ाला औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाने स्थगिती उठवून खंडकऱ्यांच्या जमिनी वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे’’.. अशा शब्दांत हा दीर्घ प्रवास सांगताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. त्याला राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व अनेक जिल्ह्य़ांतील खंडकऱ्यांचे वारस उपस्थित होते. या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाण्याच्या हक्कासह त्यांना जमिनी परत देण्यात येतील. हा ऐतिहासिक निर्णय आहे. यात काही अडचणी आल्या तरी राज्य शासनाच्या वतीने कॅव्हेट दाखल करण्यात येईल.’’ इंदापूर तालुक्यातील २ हजार २४० एकर जमीन दिवाळीपूर्वी खंडकऱ्यांना देण्यासंदर्भात तातडीची पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.
या वेळी अपर जिल्हाधिकारी गणेश पाटील, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, तहसीलदार संजय पवार, बी.डी. पाटील, बाळासाहेब डोंबाळेपाटील, अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, अरुण सावंत, अ‍ॅड. के. डी. यादव आदी उपस्थित होते.