आयुक्तांच्या अनुपस्थितीत पालिकेचा संथ कारभार; ‘पहिले पाढे पंचावन्न’ Print

पिंपरी / प्रतिनिधी
महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धडाकेबाज सुरुवात केलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची अमेरिकेतील प्रशिक्षण दौऱ्यासाठी निवड झाली व ते दोन महिन्यांच्या दौऱ्यावर गेले. मात्र, आयुक्तांच्या अनुपस्थितीत ‘पहिले पाढे पंचावन्न’ या उक्तीनुसार पालिकेत पुन्हा संथ कारभार सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
चार महिन्यांपूर्वी महापालिकेत रुजू झालेल्या आयुक्त परदेशी यांनी शहरात अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत १०० इमारती पाडण्यात आल्या. याखेरीज, वेगवान पध्दतीने काम करत सर्वानाच मरगळ झटकायला लावली. दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देत चालढकल करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या संस्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे धोरण राबवले. स्वत: डॉक्टर असल्याने वैद्यकीय विभागातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. नांदेडमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली व आठ आठवडय़ांच्या दौऱ्यावर ते रवाना झाले. रिक्त जागेवर पुण्याचे अतिरिक्त आयुक्त अनुपकुमार यादव यांच्याकडे प्रभारी सूत्रे देण्यात आली. मात्र, थोडय़ाच दिवसात परदेशींच्या अनुपस्थितीत पालिकेचा कारभार थंडावल्याचे दिसू लागले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणाचे भय वाटेनासे झाले आहे. मागील कार्यपध्दतीचा त्यांच्याकडून अवलंब होताना दिसतोय.