अटक न करण्यासाठी लाच घेताना सहायक फौजदाराला अटक Print

पुणे / प्रतिनिधी
दौंड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार राजेंद्र भाऊलाल पवार (वय ५०) यांना अटक न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याबाबत भगवान हौशीराम जगताप (वय २५, रा.खोरवडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान यांचे भाऊ व त्यांचे शेजारी लाला गायकवाड यांची दौंड येथे शेती आहे. १० ऑगस्ट रोजी शेतातून बैलगाडी नेल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली होती. या प्रकरणी दोन्ही बाजूने तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात फिर्यादी यांचे भाऊ यांना अटक न करण्यासाठी सुरुवातीस दोन हजार रुपये घेतले. आणखी आठ हजार रुपयांची लाच माहितली होती. लाच द्यायची नसल्यामुळे जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सहायक पोलीस आयुक्त हेमंत भट, राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडीक, आश्विनी सातपुते यांनी सापळा रचून पवार यांना दौंड पोलीस ठाण्यात आठ हजारांची लाच घेताना अटक केली.