राष्ट्रवादीचे बडोदा अधिवेशन पदाधिकाऱ्यांपुरतेच मर्यादित Print

पुणे/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसने १० ऑक्टोबर रोजी बडोदा येथे आयोजित केलेले राष्ट्रीय अधिवेशन हे फक्त केंद्रीय व राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांसाठीच मर्यादित असून हे राष्ट्रीय अधिवेशन असले तरी त्यात खुले अधिवेशन असणार नाही, असे पक्षाने जाहीर केले आहे.
राष्ट्रवादीतर्फे १५, १६ सप्टेबर रोजी राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ते पुढे ढकलण्यात आले. ते अधिवेशन आता १० ऑक्टोबर रोजी बडोद्यात होत आहे. हे अधिवेशन सर्व राज्यांचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य यांच्यापुरतेच मर्यादित असून या अधिवेशनात खुले अधिवेशन असणार नाही, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. मर्यादित स्वरुपाच्या प्रतिनिधींसाठी हे अधिवेशन असल्यामुळे त्यात कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची गरज नाही, असेही या पत्रकातून कळविण्यात आले आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पूर्वनिश्चितीप्रमाणे २० व २१ ऑक्टोबर रोजी बालेवाडी, पुणे येथे होणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.