वारजे, कर्वेनगरमध्येही बेकायदा इमारतींवर कारवाई Print

पुणे/प्रतिनिधी
बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत शनिवारी वारजे, कर्वेनगरमधील पाच इमारती पाडण्यात आल्या. तसेच मॉडेल कॉलनीमधील दुकानांच्या शेडवरही मोठय़ा प्रमाणावर कारवाई करण्यात आली. दिवसभरात इमारतींचे २० हजार चौरसफूट तर शेडचे तीन हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले.
कर्वेनगरमध्ये सर्वेक्षण क्रमांक १५ तसेच सर्वेक्षण क्रमांक ६ कॅनॉल गल्ली क्रमांक १ आणि वारजे येथे सर्वेक्षण क्र. १८ या भागात शनिवारी कारवाई करण्यात आली. त्यातील तीन बांधकामे पार्किंग अधिक तीन मजले अशा स्वरूपाची प्रत्येकी चार हजार ५०० चौरसफुटांची होती. या इमारतींबरोबरच चार हजार चौरसफुटांची एक आणि तीन हजार ५०० चौरसफुटांची एक अशा दोन इमारतीही पाडण्यात आल्या. ही सर्व बांधकामे निवासी विभागात करण्यात आली होती, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुधीर कदम यांनी दिली.
या भागातील १३ बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी पाच बांधकामे पाडण्यात आली. एकूण वीस हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईबरोबरच मॉडेल कॉलनीतील दुकानांच्या बेकायदा शेडवरही शनिवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन हजार चौरसफूट बांधकाम पाडण्यात आले.
सध्या जेथे बेकायदेशीररीत्या बांधकामे सुरू आहेत तेथील कारवाई हाती घेण्यात आली असून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या भागात कारवाई केली जात आहे. बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी अशाप्रकारे वेगवेगळ्या भागात कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले.