‘डेक्कन कॉलेज जगातील सर्वोत्तम संस्था व्हावी’ Print

डॉ. नरेंद्र जाधव यांची अपेक्षा
पुणे / प्रतिनिधी, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
जो आपला इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ नसतो, असे म्हटले जाते. त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रवाहांची आव्हाने असली तरी इतिहास आणि परंपरेचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे. पुरातत्त्व विद्याशाखेच्या संशोधनासाठी कार्यरत असलेली डेक्कन कॉलेज ही जगातील सर्वोत्तम संस्था व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी शनिवारी व्यक्त केली.
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात डॉ. नरेंद्र जाधव बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक व संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. म. अ. मेहेंदळे, उस्मानिया विद्यापीठाचे माजी संस्कृत विभागप्रमुख डॉ. प्रमोद लाळे आणि कर्नाटक राज्याच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक प्रा. ए. सुंदरा यांना डी. लिट. प्रदान करण्यात आली. डेक्कन कॉलेजचे संचालक डॉ. व्ही. पी. भट्ट, सहसंचालक प्रा. व्ही. एस. शिंदे या वेळी उपस्थित होते.
माझ्या जन्मापूर्वी डॉ. मेहेंदळे यांनी आपली पीएच. डी. पूर्ण केली आहे. या कार्यक्रमात त्यांची भेट झाल्यामुळे मला पुन्हा युवक झाल्यासारखे वाटले. ‘आमचा बाप अन् आम्ही’ लिहिलेले तुम्हीच का, असे मेहेंदळे यांनी मला विचारले तेव्हा मला अभिमान वाटला.
माजी कुलगुरु आणि नियोजन मंडळाचा सदस्य यापेक्षाही ही ओळख मला महत्त्वाची वाटते, असे सांगून डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, ‘‘कुलगुरुपदाच्या काळात मला संस्थेच्या कार्याची माहिती झाली आणि या कामाचे महत्त्व ध्यानात आले. परदेशात गेल्यानंतर डेक्कन कॉलेजच्या संस्कृत डिक्शनरी प्रकल्पाचे किती खंड झाले याची सातत्याने चौकशी केली जाते. सध्या जागतिकीकरणाची आव्हाने वेगळी असली तरी, त्यामध्येदेखील आपला इतिहास, परंपरा आणि पुरातत्त्व विद्या यांच्या अभ्यासाचे महत्त्व अमूल्य आहे.     

‘इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी’
पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या ८ फेब्रुवारी २००८ रोजी झालेल्या पुणे दौऱ्यामध्ये मी डेक्कन कॉलेजच्या विविध प्रकल्पांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्याचवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होऊन डेक्कन कॉलेजला हा निधी मिळाला याची आठवण डॉ. नरेंद्र जाधव यांनी करून दिली. तोच धागा पकडून डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, यापूर्वी संस्थेला निधी मिळण्यामध्ये नरेंद्र जाधव यांचे महत्त्वाचे योगदान होते. ही संस्था इतिहास आणि परंपरेचा अभ्यास करणारी आहे. त्यामुळे या इतिहासाची पुनरावृत्ती होण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.