संक्षिप्त Print

पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी घोंगडे
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी उमेश घोंगडे यांची तर प्रतिष्ठानच्या विश्वस्त कार्यवाहपदी श्याम दौंडकर यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी योगेश कुटे आणि उपाध्यक्षपदी जयराम देसाई यांची नियुक्ती झाली आहे. प्रतिष्ठानचे मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर बिजले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप रणपिसे, मारुती पिसे, डी. आर. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जोग  इन्स्टिटय़ूट्समध्ये विविध गुणदर्शन
पी. जोग ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट्स-जोग एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक कै. प्रा. डॉ. सुहास जोग यांच्या जन्मदिवसानिमित्त विविध गुणदर्शन, स्नेहमेळावा आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य-नाटय़वाचन, फॅन्सी ड्रेस, फॅशन शो, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा जोग, उपाध्यक्ष प्रा. अमोल जोग, सचिव पुष्कर जोग आणि मालती जोग यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
आर्थिक मदतीचे आवाहन
जितेंद्र यशवंत कोळी (वय १६) हा रक्ताच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. सदर उपचारांसाठी ६ लाख ५० हजार रुपये खर्च येणार असून हा खर्च करण्यास त्याचे कुटुंबीय असमर्थ आहेत. दानशूर व्यक्तींनी सह्य़ाद्री स्पेश्ॉलिटी हॉस्पिटलच्या नावाने धनादेश पाठवावा. अथवा (९८२३४७९१६७, ९५४५६३१७४१) या क्रमांकावर संपर्क  साधावा.
गणेश राऊत यांना पीएच. डी.
गणेश राऊत यांनी नुकतीच पुणे विद्यापीठाची पीएच. डी. प्राप्त केली आहे. ‘भूदान चळवळ : एक चिकित्सक अभ्यास-विशेष संदर्भ महाराष्ट्र’ हा त्यांचा पीएच. डी.चा विषय होता. त्यांना अहमदनगर येथील के. जे. सोमय्या कॉलेजचे डॉ. सी. जे. अभंग यांनी मार्गदर्शन केले. ऑक्टोबर २००९ मध्ये राऊत यांनी त्यांचा विषय सादर केला होता.
डॉ. अरुण दातार यांना पुरस्कार
भारतीय विद्याभवन पुणे केंद्र आणि अ‍ॅडव्होकेट डी. आर. नगरकर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘संयुक्त पुरस्कार २०१२’ ज्येष्ठ शरीरसौष्ठव प्रशिक्षक डॉ. अरुण दातार यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य, संगीत, सामाजिक कार्य, संशोधन व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिर
 नारळकर इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर डेव्हलपमेंट अँड रीसर्च संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण रक्तपेढीच्या वसुधा नेने यांनी रक्त व रक्तदान याविषयी स्लाईड शो द्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली. शिबिराचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्राचे रवींद्र चव्हाण यांनी रक्तादान करून केले. संस्थेचे संचालक प्रा. डॉ. गंगाधर शिरुडे यांच्या विषेश मार्गदर्शनाखाली आयोजित य शिबिरात एकूण १२५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
प्रतिबिंब कविसंमेलन उत्साहात
तरुणभाई खाटडिया यांनी नुकत्याच ‘प्रतिबिंब’ कविसंमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. शकुंतला काळे, अलका मुळीक, संध्या गोळे, दीपक करंदीकर, अमृता गायकवाड आदी कवी-कवयित्रींनी आपल्या कविता साद केल्या. प्रतिबिंब कविसंमेलन म्हणजे मराठी कवितेची चळवळ आहे. अशी कविसंमेलने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उफयुक्त आहेत, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मराज निमसरकर यांनी व्यक्त केले.
दिवे दुरुस्तीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील डी.पी रस्ता व पुणे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावरील दिवे बंद आहेत. हे दिवे लवकरात लवकर दुरुस्त करून चालू करण्यात यावे, असे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे उपायुक्त पुणे मनपा विद्युत विभागाला देण्यात आले. पुणे शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावरील दिवे बंद असल्याकरणाने चोरी व अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने पालिकेने हे दिवे लवकरात लवकर दुरुस्त करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.