‘आय टूआय’ मध्ये देशभरातील पंधराशे विद्यार्थ्यांचा सहभाग Print

प्रतिनिधी
इग्नायटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया (आय टू आय)२०१२-१३ या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले असून या वर्षी या महोत्सवामध्ये देशातील विविध शहरांमधील एक हजार पाचशे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय येणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भाऊ इन्स्टिटय़ूट ऑफ इनोव्हेशन एंत्रप्रेन्युअरशिप अँड लीडरशिप आणि इटॉन यांच्या तर्फे दरवर्षी आय टू आय महोत्सवाचे आयोजन केले जाते. ‘सोशल एंत्रप्रेन्युअर्स’ची निर्मिती करणे, एखाद्या तरी समस्येवर उपाय मिळावा या दृष्टीने हा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवामध्ये विद्यार्थाना तीन ते सहा जणांच्या गटाने एखाद्या समस्येवर उपाय शोधायचा असतो. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाला अधिकाधिक सहा हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात येते. पर्यावरण, आरोग्य, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती या विषयांमध्ये अथवा एखाद्या सामाजिक समस्येवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर करायचा असतो. सादर झालेल्या प्रकल्पांमधून दोनशे प्रकल्पांची निवड केली जाते. प्रत्येक विषयातील सवरेत्कृष्ट प्रकल्पाला पारितोषिक दिले जाते. इटॉनमधील कर्मचारी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून आणि परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
या वर्षी देशातील तीस शहरांमधील शंभर महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.