गिरिकंद ट्रॅव्हल्सच्या संचालकांना मारहाण केल्याबद्दल तिघांना अटक Print

प्रतिनिधी
गिरिकंद ट्रॅव्हल्सच्या बसची तोडफोड करत संचालक अखिलेश विश्वास जोशी (रा. डेक्कन जिमखाना) यांना मारहाण करणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. गिरिकंद ट्रॅव्हल्सला कर्मचाऱ्यांची वाहतूककरण्याचे मिळालेले कंत्राट त्यांनी घेऊ नये, म्हणून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सोमनाथ साहेबराव दरेकर, प्रवीण शहाजी दरेकर (दोघे रा. सणसवाडी) आणि प्रमोद सोमनाथ बागलामे (रा. भोसरी) यांना अटक करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील डिग्रजवाडी येथील एका कंपनीने गिरिकंद ट्रॅव्हल्स कंपनीला कामगारांची वाहतूक करण्याचे कंत्राट दिले होते. हे कंत्राट जोशींनी घेऊ नये म्हणून आरोपी दरेकर व इतर काही जण प्रयत्न करत होते. त्यांनी गिरिकंदचे व्यवस्थापक देसाई यांना हे कंत्राट सोडावे म्हणून फोन करून धमकीही दिली होती. बसचालकांनाही दम दिला. ५ ऑक्टोबर रोजी जोशी हे आयटीडब्लू कंपनीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना दगड फेकून मारला होता. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या वेळी त्यांची मोटार व एका बसची तोडफोड केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.