बोलक्या बाहुल्याही झाल्या ‘हाय टेक’! Print

प्रतिनिधी
बोलक्या बाहुल्यांचा किंवा दोरीवर हलणाऱ्या कठपुतळ्यांचा खेळ आबालवृद्धांच्या आनंदाचा ठेवा असतो. काळानुरूप या बोलक्या बाहुल्याही ‘हाय टेक’ झाल्या आहेत. आता या कापडी बाहुल्यांची जागा चक्क रोबोटने घेतली असून त्यांच्या सर्व हालचाली ‘मोशन सेन्सर’ तंत्रज्ञान वापरून करून घेणे शक्य झाले आहे.
बंगळुरूच्या ‘सेंटर फॉर इलोक्ट्रॉनिक्स डिझाईन अँड टेक्नोलॉजी’ या संस्थेचे प्रा. एन.एस. दिनेश आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना सत्यात उतरविली आहे. पुणे विद्यापीठाच्या उपकरण शास्त्र विभाग व ओअॅसिस टेक्नोलॉजी प्रा.लि. याच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या रोबोटिक्सविषयक कार्यशाळेची (एम्बेडोपिडिया) रविवारी सांगता झाली.राज्यातील अभियांत्रिकी आणि शास्त्र शाखेत शिकणाऱ्या तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस हजेरी लावली. या वेळी प्रा. दिनेश यांनी विद्यार्थ्यांना या यंत्ररूपी बोलक्या बाहुल्यांमागचे ‘तंत्र’ उलगडून दाखविले. यात वापरलेल्या तंत्रज्ञानात बाहुलीचा ‘बोलविता धनी’ जो असेल त्या माणसाच्या हालचाली ‘मोशन सेन्सर’ तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक पकडल्या जातात; आणि बाहुलीरूपी रोबोट तीच हालचाल करून दाखवितो. प्रा. दिनेश यांनी सांगितले की, मला गिटार वाजविण्याचा, चित्रे, शिल्पे बनविण्याचा छंद होता. या छंदांमुळेच तंत्रज्ञानाचा वापर पारंपरिक बोलक्या बाहुल्यांच्या खेळात कसा करता येईल याबाबत प्रयोग करण्याचे मला सुचले. कोणतीही पारंपरिक कला कायम जीवित रहावी असे मला वाटते. बोलक्या बाहुल्यांच्या खेळात या रोबोट स्वरूपातील बाहुल्या वापरणे सुरू झाले तर त्यात अधिक कल्पकता आणता येईल. तसेच या कलेतील व्यावसायिक फायदा वाढविणेही शक्य होईल. याच कार्यशाळेत ‘एस.टी. रोबोटिक्स’ कंपनीचे तंत्रव्यावसायिक व्यवस्थापक रवी शहा यांनी औद्योगिक उपयोगांसाठी बनविलेल्या रोबोटसबाबतचे सादरीकरण केले. रसायनांचे परीक्षण करणे, मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केलेल्या वस्तू खोक्यात वेगाने बसविणे अशी कामे करणाऱ्या रोबोटसच्या हलत्या प्रतिकृतीही या वेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बघायला मिळाल्या.