स्वत:च्या छायाचित्राचे टपाल तिकीट छापण्याची पुन्हा संधी! Print

पुणे / प्रतिनिधी
स्वत:च्या छायाचित्राचा समावेश व आवडीची रचना असलेले टपाल तिकीट छापून घेण्याची संधी टपाल खात्याच्या पुणे विभागाने पुन्हा एकदा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी ‘माय स्टॅम्प’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.
टपाल खात्याच्या बालेवाडी येथे जानेवारीमध्ये झालेल्या ‘महापेक्स २०१२’ या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सर्वप्रथम ‘माय स्टॅम्प’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. संपूर्ण प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी प्रामुख्याने या उपक्रमाला नागरिकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. ‘माय स्टॅम्प’ बाबत टपाल खात्याकडे वेळोवेळी नागरिकांनी मागणी नोंदविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे निमित्त साधून पुन्हा काही काळ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘माय स्टॅम्प’ उपक्रमात ठराविक शुल्क आकारून नागरिकांना त्यांच्या पसंतीची टपाल तिकिटे तयार करून देण्यात येणार आहे. या तिकिटांवर स्वत:चे छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणे तिकिटावर आपल्याच पसंतीची रचनाही वापरता येणार आहे. ही तिकिटे टपाल खात्याची अधिकृत तिकिटे असणार आहेत. या तिकिटांचा वापर करून आपल्याला टपालही पाठविता येणार आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या निमित्ताने टपाल खात्याच्या पुणे विभागाच्या वतीने आठवडाभर विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम
राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त बुधवारी (१० ऑक्टोबर) पुणे, सातारा, पंढरपूर, अहमदनगर आणि श्रीरामपूर येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (११ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला माय स्टॅम्पसाठी १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल कर्नल के. सी. मिश्रा यांनी दिली.