जकातचोरांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी Print

पुणे/प्रतिनिधी
जकात चुकवेगिरी करून जे जे वाहतूक व्यावसायिक महापालिकेचे आर्थिक नुकसान करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, तसेच जकात चुकवेगिरी प्रकरणात सिंडिकेट ट्रान्सपोर्ट या वाहतूक व्यावसायिकाला काळ्या यादीत टाका अशी जोरदार मागणी स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली.
विरोधी पक्षनेता वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी पहाटे बालेवाडी जकात नाक्यावर मनसेच्या कार्यकत्यांनी जकातचोरीचे चार ट्रक पकडले होते. पाठलाग सुरू असताना तीन ट्रक पळून गेले. लाखो रुपयांचा माल या ट्रकमधून जकात चुकवून आणण्यात येत होता. त्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर स्थायी समितीत मंगळवारी बाबू वागसकर यांनी जकातचोरीचा विषय उपस्थित केला. त्या प्रकरणात सिंडिकेट ट्रान्सपोर्ट या वाहतूक व्यावसायिकामार्फत जकातचोरी सुरू होती. त्या व्यावसायिकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाका, अशी मागणी वागसकर यांनी यावेळी केली.
जकातचोरीच्या प्रकरणात कोणी माजी पदाधिकारी वा नगरसेवक दबाव आणत असतील, तर त्यांचीही नावे प्रशासनाने जाहीर करावीत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारी जकातचोरी थांबलीच पाहिजे, असेही या वेळी प्रशासनाला सांगण्यात आले. जकात प्रमुखांना बंदूकधारी पोलिसांचे संरक्षण द्यावे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.