लाचखोरांच्या शिक्षेच्या टक्केवारीत राज्यात पुणे विभाग आघाडीवर Print

यावर्षी ऑगस्टअखेर ८० जणांस शिक्षा
पुणे/श्रीकृष्ण कोल्हे
राज्यात गेल्या दोन वर्षांत लाचखोरांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून, यावर्षी आतापर्यंत ऐंशी लाचखोरांना शिक्षा झाली आहे. लाचखोरांना शिक्षा होण्याच्या टक्केवारीत पुणे विभागाचा पहिला क्रमांक आहे. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधकचे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेड असे एकूण आठ विभाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या आठ विभागात लाचखोर अधिकाऱ्यांना शिक्षा होण्याच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. २०१० मध्ये राज्यात एकूण ३५३ गुन्ह्य़ांचा निकाल लागला. त्यामध्ये फक्त ६८ जणांस शिक्षा झाली होती, तर २८५ जणांची निर्दोष सुटका करण्यात आली. यावर्षी शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त १९ टक्के होते. २०११ मध्ये शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाली. यावर्षी एकूण ३८३ लाच घेतल्यासंदर्भातील खटल्याचा निकाल लागला. त्यामध्ये ९० जणांस शिक्षा झाली, तर २९३ जणांची निर्दोष सुटका झाली. यावर्षी शिक्षेची टक्केवारी २३ टक्के होती.
२०१२ मध्ये ऑगस्टपर्यंत ३३० खटल्यांचा निकाल लागला असून त्यामध्ये ८० जणांस शिक्षा झाली असून अडीचशेजणांची सुटका झाली आहे. यावर्षी शिक्षेचे प्रमाण हे २४ टक्के आहे.
राज्यात २०१२ मध्ये लाचखोरांच्या शिक्षेत पुणे विभाग आघाडीवर असून यंदा आतापर्यंत २६ जणांस शिक्षा झाली आहे. विभागाची  शिक्षेची टक्केवारी ३७ टक्के आहे. मुंबईमध्ये यंदा ११ लाचखोरांना शिक्षा झाली असून शिक्षा होण्याची टक्केवारी २१ टक्के आहे, तर ठाणे १४, नाशिक १५, नागपूर ११, अमरावती २९, औरंगाबाद २५, नांदेड ३५ अशी विभागाची शिक्षेची टक्केवारी आहे.      
लाच घेणाऱ्या तलाठय़ासह दोघांना सक्तमजुरी
वाटणीपत्राची फेरफारची नोंद करण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठय़ाला व त्याच्या मदतनिसाला एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुलाब भागूजी दिघे (रा. लोणी काळभोर) आणि मदतनीस नारायण गणपत रुपनर (रा. लोणी काळभोर) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी दिलीप गुलाबराव काळभोर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून १७ जानेवारी २००७ रोजी दिघे यांना मदतनिसामार्फत लाच घेताना अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून एस. एम. जगताप यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस हवासदार दत्तात्रय जोशी यांनी मदत केली.