‘होर्डिग धोरणाच्या विषयपत्रात माझ्या नावाचा उल्लेख चुकीचा’ Print

पुणे/प्रतिनिधी
महापालिकेच्या होर्डिग धोरणासंबंधीच्या विषयपत्रात प्रशासनाने केलेला माझ्या नावाचा उल्लेख पूर्णत: चुकीचा असून त्यासाठी झालेल्या बैठकीशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे. होर्डिग धोरण निश्चित करण्यासाठी उशीर होत असल्यामुळे महापालिकेचे, पर्यायाने शहराचे जे आर्थिक नुकसान होत आहे, ते होऊ नये अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
होर्डिग मालकांना काही अटींवर पुन्हा जाहिरातींचे हक्क देण्याचे विषयपत्र महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवले आहे. खासदार वंदना चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीत अशी चर्चा झाली होती व त्यानुसार हे विषयपत्र ठेवण्यात येत आहे, असे प्रशासनाच्या विषयपत्रात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारे असून राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या दबावाखालीच हे विषयपत्र ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेने केला आहे.
या विषयपत्राबाबत खासदार चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांची बाजू मांडली असून या पत्रकात त्या म्हणतात की, पुणे शहरातील विकास कामांसंबंधी चर्चा करण्यासाठी मी आयुक्तांकडे गेले असता त्या ठिकाणी होर्डिग धोरणाबाबत चर्चा सुरू होती. त्या बैठकीशी माझा कोणताही, कसलाही संबंध नव्हता. होर्डिग धोरण हा पूर्णत: महापालिका पदाधिकारी व प्रशासन यांच्या कार्यकक्षेतील विषय आहे. त्यांनी मिळून शहराच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी माझी ठाम भूमिका आहे. संबंधित विषयपत्रात माझ्या नावाचा करण्यात आलेला उल्लेखही सर्वस्वी चुकीचा आहे.
हे धोरण निश्चित करण्यासाठी उशीर होत असल्यामुळे महापालिकेचे, पर्यायाने शहराचे जे आर्थिक नुकसान होत आहे, ते होऊ नये अशी माझी भूमिका आहे, असेही चव्हाण यांनी या पत्रकात नमूद केले आहे.