परदेशी विद्यार्थ्यांचा ‘पुणेरी’ चौकसपणा! Print

महापालिकेला भेट देऊन केली महापौरांशी चर्चा
पुणे / प्रतिनिधी
पुण्यातील अनधिकृत बांधकामे.. कामाच्या शोधात बाहेरून आलेले लोक.. झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन.. पुण्याची वाहतूक व्यवस्था.. कचऱ्याची समस्या.. पुण्याशी संबंधित हे प्रश्न पुणेकरांनी नव्हे, परदेशी विद्यार्थ्यांनी विचारले तर?.. केवळ काही आठवडय़ांच्या पुण्यातील वास्तव्यात या शहराची अस्सल पुणेकरांइतकीच माहिती मिळविलेल्या या विद्यार्थ्यांनी पुणेकरांच्याच चौकसपणाने थेट महापौरांपुढे हे प्रश्न मांडले.
‘द जर्मन अकॅडेमिक एक्सचेंज सव्‍‌र्हिस’ तर्फे (डीएएडी) आलेले जर्मन विद्यार्थी सहा आठवडय़ांपासून पुण्यात राहात आहेत. तसेच ‘मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर्स’ तर्फे मलेशिया, वेस्ट इंडिज, त्रिनिदाद अँड टोबॅगो, फिजी अशा विविध देशाचे विद्यार्थी गेल्या चार आठवडय़ांपासून पुण्यात आले आहेत.
एकूण तेवीस विद्यार्थ्यांनी आज पुणे महापालिकेला भेट दिली आणि पुण्याच्या प्रश्नांवर महापौरांशी चर्चाही केली. ‘सिंबॉयोसिस’ च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विद्यार्थ्यांची पुण्याबाबतची माहिती आणि चौकसवृत्ती वाखाणण्याजोगी होती. उपायुक्त सुरेश जगताप, महापालिकेतील रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ भेंडे या वेळी उपस्थित होते. महापौर वैशाली बनकर यांना आपण या क्षेत्रात कशा आलात, कामाचे नियोजन कसे करणार, कोणत्या प्रश्नांना प्राधान्यक्रम देणार असे उत्स्फूर्त प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. उपस्थितांनी महापौरांना हे प्रश्न मराठीतून सांगितले.
मग महापौरांनी मराठीतून दिलेली उत्तरे विद्यार्थ्यांना इंग्रजीत भाषांतरित करून सांगण्यात आली. हा संवाद चांगलाच रंगला. या तेवीसजणांमध्येही केवळ चार-पाच मुले वगळता इतर सगळ्या मुली होत्या हे आणखी विशेष. याशिवाय या विद्यार्थ्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, अजित अभ्यंकर, डॉ. विश्वंभर चौधरी आदींशीही चर्चा केली.