पिंपरी पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेतून अजितदादांना वगळले! Print

पिंपरी / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांचे नाव पिंपरी पालिकेच्या वर्धापनदिनाच्या निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी पालिकेत अजितदादा सर्वेसर्वा असून त्यांचे नाव नसलेल्या पत्रिका प्रथमच बाहेर पडल्याने त्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
पिंपरी पालिकेचा गुरूवारी वर्धापनदिन आहे. नेहमीच्या सवयीने जनसंपर्क विभागाने कार्यक्रमाच्या ऐन तोंडावर निमंत्रण पत्रिकांचे वाटप सुरू केले. मंगळवारी सायंकाळनंतर नगरसेवकांना वर्धापनदिनाच्या पत्रिका मिळू लागल्या.
त्यावर नजर टाकल्यानंतर अजितदादांचे पत्रिकेत नाव नसल्याचे पाहून राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, प्रभारी आयुक्त अनुपकुमार यादव अशी डझनभर नावे असताना अजितदादांचे नाव मात्र नव्हते. त्यांचे नाव पत्रिकेतून गाळण्याचे कारण काय, असा प्रश्न अनेकांनी एकमेकांना विचारला.
मात्र, कोणालाही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करताच सर्वानी कानावर हात ठेवले. पत्रिका महापौरांनी फायनल केल्याचे सांगून हात झटकले. महापौरांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.
पिंपरी पालिकेत शरद पवार यांच्यापेक्षा अजितदादा समर्थकांची संख्या जास्त आहे. दोन्ही पवारांचा संघर्ष असला असे मान्य केले तरी अजितदादांशी पंगा घेण्याचे धाडस किमान पिंपरीत तरी होणार नाही. सध्या अजित पवार कोणत्याही पदावर नाहीत. त्यांचे नाव असल्यास त्याचे राजकीय भांडवल होऊ शकते, असा युक्तिवाद केला जातो. तथापि, अधिकृतपणे कोणीही भाष्य करण्यास तयार नाही.