पादचाऱ्याला जखमीला करून रुग्णालयात नेताना रिक्षावाल्याने मध्येच टाकून दिले Print

उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू
पुणे / प्रतिनिधी
रिक्षाचालकाने पादचाऱ्याला ठोकर दिल्यानंतर रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून नेले आणि त्याला गंभीर जखमी अवस्थेत मध्येच गवतात टाकून दिले. या घटनेत या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. महंमदवाडी-हडपसर रस्त्यावर सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे.
या घटनेत मरण पावलेल्या पादचाऱ्याचे नाव लतीफ मैहताब शेख (वय ५५, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिसांना हडपसर येथील साने गुरुजी हॉस्पिटल जवळील गवतामध्ये एक मृतदेह आढळून आला. त्यानुसार सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याचा तपास सुरू केला असता १ ऑक्टोबरला हडपसर-महंमदवाडी रस्त्यावर अमित चिकन सेंटरच्या समोर एका रिक्षा चालकाने शेख यांना उडविले. या अपघातात शेख हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर या ठिकाणी अनेक नागरिक जमा झाले असता त्या रिक्षा चालकाने उपचारासाठी म्हणून शेख यांना रिक्षात टाकले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शेख यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतामध्ये टाकून दिले. त्यामुळे जखमी शेख यांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्य़ाचा तपास करताना पोलिसांना एक रिक्षा क्रमांक मिळाला असून त्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडे मागविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक पी. डी. थोरात यांनी दिली.