फसवणुकीचा धक्का सहन न झाल्याने तरुणाचा मृत्यू Print

परदेशात नोकरीच्या बहाण्याने पावणेसहा लाखांची फसवणूक
पुणे / प्रतिनिधी
परदेशात मोठय़ा पगाराची नोकरी देण्याच्या आमिषाने पुण्यात हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण घेतलेल्या तरुणाची सुमारे सहा लाख रुपयांची फसवणूक झाली. या फसवणुकीचा धक्का सहन न झाल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.
विकेशचंद्र मोहन प्रसाद (रा. काचुला, उत्तराखंड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून आकांक्षा पाटील या नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद याने पुण्यातच हॉटेल मॅनेजमेन्टचे शिक्षण घेतले होते. तो नोकरीच्या शोधात असताना त्याने अनेक ठिकाणी आपला बायोडाटा दिला होता. त्याला ईमेलवरून परदेशात मोठय़ा पगाराची नोकरी असल्याचे समजले. त्यासाठी सुरुवातीला चाळीस हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. त्यानुसार त्याने विमानतळ येथील अ‍ॅक्सीस बँकेत पैसे भरले. त्यानंतर वेळोवेळी मेल करून वेगवेगळ्या कारणांसाठी विविध शाखांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार प्रसाद याने पाच लाख ८२ हजार भरले. त्यानंतर मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर तो आपल्या उत्तरांचल येथील मूळ गावी गेला. मात्र, त्याला फसवणूक झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक कोलते यांनी दिली. प्रसाद याच्या मृत्यूमुळे तपासात अडचणी येणार आहेत. तपास सुरू असल्याचे कोलते यांनी सांगितले.