संक्षिप्त Print

टपाल दिनानिमित्त पोस्टमनचा सत्कार
इंटरनेट, एसएमएस आणि कुरिअरच्या जमान्यातही लोकांपर्यंत टपाल पोहोचविणाऱ्या पोस्टमन्सचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला. जागतिक टपाल दिनानिमित्त करण्यात आलेल्या या सत्कारामुळे पोस्टमन भारावून गेले. विश्रामबागवाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप काळोखे यांच्या हस्ते दररोज पायपीट करून घरोघरी जात सेवा देणाऱ्या सिटी पोस्ट आणि टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाजवळील टपाल कार्यालयातील पोस्टमन यांच्यासह अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या वेळी भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
‘निर्णय’ लघुपटाचे प्रदर्शन
सफाई कामगारांच्या प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या ‘निर्णय’ या लघुपट सर्वाच्या भेटीला येत आहे. पुणे मनपातील सफाई कामगार सतीश लालबिगे यांची निर्मिती हे या लघुपटाचे वैशिष्टय़ आहे. ‘मेहतर समाजातील एक सफाई कामगार आणि त्याचे कुटुंब’ यांच्यावर हा लघुपट आधारित आहे. या लघुपटाचे उद्घाटनीय प्रदर्शन ११ ऑक्टोबर रोजी मंगला चित्रपटगृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुला आहे.
‘आयएमए’ची हडपसर शाखा
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हडपसर शाखेचे उद्घाटन नुकतेच डॉ.के.एच.संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. बदलत्या काळात औषधे आणि तंत्र प्रगत झाले असले तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी त्यांच्याशी साधलेला संवाद आजही महत्त्वाचा वाटत असून, त्याकडे डॉक्टरांनी लक्ष द्यावे असे आवाहन डॉ.संचेती यांनी या वेळी केले. डॉ.क्वाएद जोहर धारिवाल, आयएमए राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ.मििलद नाईक, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.देवेंद्र शिरोळे आदी या कार्यक्रमास उपलब्ध होते.
एड्सग्रस्त मुलांसाठी निधी
ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पामधून ‘स्पर्श बालग्राम’ संस्थेतील एचआयव्ही एड्सग्रस्त मुलांसाठी एक लाख पन्नास हजार रुपयांचा निधी देण्यात आला. या संस्थेमध्ये सध्या १६ बालके आहेत. स्पर्श बालग्रामचे सुजाता यादव यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राजन जगताप, किशोर पिंगळीकर, महेश खुरसाळे आदी या वेळी उपस्थित होते.
‘मणिरत्न शिक्षक गौरव’
पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टतर्फे ‘मणिरत्न शिक्षक गौरव’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. या वर्षीचा हा पुरस्कार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री वाघेश्वर विद्यालय, वाघोली येथील विज्ञान अध्यापक सुखदेव तांबे यांना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी, समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, एल. एन. जाधव, चंद्रभान भोयर, डॉ. रवींद्र भोळे आदी उपस्थित होते.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ
केंद्र शासनाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबपर्यंत वाढवण्यात आली आहे.
केंद्र शासनाकडून मुस्लीम, पारशी, शीख, बौद्ध व ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज यावर्षी पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. हे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
इंजिनीअर यांचे व्याख्यान
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने महात्मा गांधी सप्ताहांतर्गत ज्येष्ठ विचारवंत व इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. असगर अली इंजिनिअर यांनी ‘इस्लाम धर्म आणि अहिंसा’ या विषयावर आपले विचार मांडले. आपल्या समाजात धर्म व जातीवर आधारित निर्माण होणारी ओळख महत्त्वाची मानली जाते. पण धर्मातील खरी मूल्ये अंगीकारली तर अहिंसा प्रस्थापित होईल, असे मत डॉ. इंजिनिअर यांनी या वेळी व्यक्त केले. स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.