एसटीची पुणे-दादर ‘शिवनेरी’ आता स्वारगेट स्थानकावरूनही! Print

पुणे/प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाची वातानुकूलित शिवनेरी ही पुणे-दादर मार्गावरील गाडी आता स्वारगेट स्थानकावरूनही सोडण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात या सेवेचा लाभ प्रवाशांना मिळू शकणार आहे.
पुणे-दादर मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी गाडय़ा सध्या एसटीच्या पुणे स्टेशन स्थानकावरून सोडण्यात येतात. आरामदायी व वेळेत प्रवास पूर्ण होत असल्याने या गाडीला सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातील काही गाडय़ा चांदणी चौक मार्गाने, तर िपपरी- चिंचवडकरांच्या सोयीसाठी ठराविक गाडय़ा चिंचवड मार्गाने सोडण्यात येतात. स्वारगेट स्थानकावरून इतर काही मार्गावर शिवनेरी गाडय़ा सोडण्यात येतात. मात्र, दादरसाठी अनेक प्रवाशांना पुणे स्थानकावर जावे लागत असल्याने ही गाडी स्वारगेट स्थानकावरूनही सोडण्यात यावी, अशी मागणी स्वारगेट, कात्रज आदी परिसरातील प्रवाशांकडून करण्यात येत होती.
प्रवाशांच्या मागणीचा विचार करून आता स्वारगेट स्थानकावरूनही पुणे-दादर मार्गावर शिवनेरी गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट स्थानकावरून सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत प्रत्येक तासाला एक गाडी सोडण्यात येणार आहे. या सर्व गाडय़ा चांदणी चौक मार्गाने जाणार आहेत. येत्या आठवडाभरात प्रवाशांना ही सुविधा मिळू शकणार आहे.