धानोरी प्रभागाच्या समस्यांबाबत नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा Print

पुणे/प्रतिनिधी
नियमित पाणीपुरवठय़ासह रस्ते, भाजी मंडई, उद्यान, मैदाने आदी सुविधांचा विकास प्रभागात करावा यासह विविध मागण्यांसाठी धानोरी प्रभागातील नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. प्रभागातील समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त महेश पाठक यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.
धानोरी प्रभागाच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सांगता जाहीर सभेने झाली. नगरसेविका रेखा टिंगरे तसेच चंद्रकांत टिंगरे यांची यावेळी भाषणे झाली. प्रभागातील पाणीपुरवठा अतिशय विस्कळीत असून सध्या देखील दर तीन दिवसांनी आमच्या प्रभागात पाणी येते. अनेक भागात अनियमितपणे आणि रात्री-अपरात्री पाणी येते. नियमित पाणीपुरवठय़ासाठी वारंवार पाठपुरावा केला. तसेच पाणीपुरवठय़ाच्या विविध योजनाही प्रशासनाला सादर केल्या. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रभागात जलवाहिन्यांची कामे होत नसल्याची तक्रार टिंगरे यांनी मोर्चानंतर आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली.
धानोरी परिसरातील काही रस्त्यांची कामेही रखडली असून ती तातडीने पूर्ण करावीत, तसेच या भागात उद्यान, खेळासाठी मैदान, भाजी मंडई यासाठी काही जागांवर आरक्षणे आहेत. त्या जागा ताब्यात घेऊन तेथे नागरिकांसाठी विविध सेवा-सुविधा विकसित कराव्यात अशीही मागणी मोर्चाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.