शिक्षकांना मतदार नोंदणीची कामे देणे Print

हा तर शिक्षण हक्क कायद्याचा भंग
मनसेकडून आक्षेप
 पुणे/ प्रतिनिधी
तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी तरतूद शिक्षण हक्क कायद्यात असतानाही बहुसंख्य शिक्षकांना मतदार नोंदणीची कामे करायला लावणे हा या कायद्याचाच भंग होत असल्याचा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. या व अशा काही मुद्दय़ांवर कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे यांनी शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांना पाठविले आहे. शिक्षण संचालनालयानेही या मागण्यांना अनुकूलता दाखवत हे निवेदन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठविले आहे.
मतदार नोंदणीच्या कामांवर असलेल्या शिक्षकांना शाळेत वारंवार गैरहजर रहावे लागते, त्यामुळे सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनाच्या कार्यक्रमाला खीळ बसत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे हे सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकन शिक्षकाने दररोज करणे अपेक्षित आहे. मतदार नोंदणीचे काम करून दररोज सहा तास अभ्यासपूर्ण अध्यापन करण्याची अपेक्षा शिक्षकांकडून बाळगणे अवास्तव आहे. तसेच वर्गावर वारंवार बदली शिक्षक नेमल्याने अशा शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचे भावनिक नाते चटकन निर्माण होऊ शकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहतो असे मनसेने म्हटले आहे. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबर २००७ ला राष्ट्रीय निवडणूक आयोगाविरूद्ध निकाल देताना, शिक्षकाला शैक्षणिक कालखंडात शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामांना जुंपू नये, असा आदेश दिला असल्याचेही मनसेच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. साळुंखे यांनी या पत्रास अनुकूलता दाखवत या मुद्दय़ांवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करणारे पत्र शिक्षण सचिवांना पाठविले आहे.