१६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान पुणे नवरात्री महोत्सवाचे आयोजन Print

पुणे / प्रतिनिधी
कला, संस्कृती, नृत्य, गायन व वादन यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्री महोत्सव १६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे होणार आहे.
या प्रसंगी वनमंत्री पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, जेष्ठ अभिनेत्री हेलन आदी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ हेलन यांची विशेष मुलाखत घेणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘पती सगळे उचापती’ हे मराठी नाटक सादर केले जाणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष नगरसेवक आबा बागूल यांनी दिली. या महोत्सवा दरम्यान राजेश खन्ना यांना श्रद्धांजली म्हणून ‘ये शाम मस्तानी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच, गझल संध्याकाळ, आशा भोसले यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘आशा के रंग’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या पंचाहत्तरी निमित्त ‘भाव-सरगम’ तर हिंदी चित्रपट सृष्टीला १०० वर्ष झाल्यानिमित्ताने ‘म्युझिक इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच लावणी महोत्सव, म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असेही बागूल यांनी सांगितले.