जागतिक पातळीवर परिणामकारक लशींचा अभाव- ज्युल्स हॉफमन Print

पुणे / प्रतिनिधी
‘‘परिणामकारक लशी बनविण्यात आपल्याला अजूनही यश आलेले नाही. पण रसायनशास्त्राच्या खोलवर अभ्यासातून रेणूंचे नवीन संयोग शोधून काढता येतील. या लशी प्रभावी ठराव्यात यासाठी पूरक उपचारांचीही तितकीच गरज आहे,’’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते प्रा. ज्युल्स हॉफमन यांनी व्यक्त केले.
‘इंडो-फ्रेंच सेंटर फॉर प्रमोशन ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड रीसर्च’ (आयएफसीपीएआर) या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांबाबत ‘अँटीमायक्रोबिअल डिफेन्स ऑफ ड्रोसोफिला- अ पॅरॅडिग्म फॉर इननेट इम्युनिटी फ्रॉम फ्लाईज टू ह्य़ूमन्स’ या विषयावर हॉफमन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हॉफमन म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवर काही कंपन्या उपचारांची ग्रहणशीलता तपासून त्यानुसार औषधनिर्मिती करत आहेत. भविष्यात रोगप्रतिकारक शक्तीशी निगडित असलेल्या आजारांवर यशस्वी उपचार शोधता येऊ शकतील.’’
घातक जिवाणू किंवा सूक्ष्मजीवांनी शरीरात प्रवेश केला असता माणूस आणि ‘ड्रोसोफिला’ या कीटकाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कशी काम करते, यावर हॉफमन यांनी आपली निरीक्षणे नोंदविली. घातक सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यावर लगेच शरीर जो प्रतिकार करते त्याला ‘इननेट प्रतिकारशक्ती’ असे म्हणतात. प्रा. हॉफमन आणि डॉ. ब्रूस बटलर यांनी या प्रतिकारशक्तीला चालना देणारी प्रथिने शोधून काढली आहेत. शरीरात शिरलेल्या या सूक्ष्मजीवांना त्यांच्या दुष्परिणामांना ही प्रथिने मारक ठरतात. हा शोध रोगप्रतिबंध आणि उपचारांच्या नवीन पद्धती शोधण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. प्रा. हॉफमन पुढील आठवडय़ात भारतातील विविध विज्ञानविषयक संस्थांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.