लहानग्यांसाठी पुस्तकातून उलगडणारे पर्यावरण.. Print

पुणे/श्रीराम ओक
ऐन पावसाळ्यातील पाणीकपातीनंतर पुणे शहराला पाणी मिळाले खरे, पण पुणेकरांनी त्यांची पाण्याची नासाडी करण्याची सवय सोडली नाही. पुण्याजवळच्या गावांमध्ये आजही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, याची जाणीवच आपल्याला राहिली नाही. पाणी वाचवण्याबरोबरच पर्यावरणाचा ढासळणारा समतोल याबाबत कोणीतरी जबाबदारी घ्यायलाच हवी. ती बालचमुंनी घेतली तरच त्यांचे भावी आयुष्य सुकर होईल.. यासाठी पर्यावरणविषयक ज्ञान देणारी लहानांसाठीची पुस्तके नक्कीच मदत करतील.
मनोविकास प्रकाशनाचे ‘परिसर आणि स्वावलंबन’ हे असेच अनुवादित पुस्तक. आपणच आपला परिसर कसा दूषित करतो याची ते माहिती देते. तर याच प्रकाशनाचे अरुण जोशी यांनी लिहिलेल्या ‘आपले पर्यावरण’ या पुस्तकात पर्यावरण विषय, राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय कायद्यांच्या बरोबरीनेच पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत असणाऱ्या अनेक घटकांबाबत माहिती देते. पर्यावरण म्हणजे काय याची उकल करीत असताना पर्यावरणाचे आजीव घटक कोणते याबाबत यामध्ये वाचायला मिळते.
पावसाविषयी सखोल माहिती सोप्या शब्दांत मांडणारे ऊर्जा प्रकाशनाचे पुस्तक म्हणजे ‘गोष्ट पावसाची.’ विलास गोगटे यांनी गोष्टीच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास निसर्गानुरूप जीवनशैलीची ओळख करून दिली आहे. पाऊस वेळेवर पडणार का? कधी पडणार? कसा पडणार? हे कसं ओळखायचे याबरोबरच पर्यावरणातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्राण्यांविषयी यात वाचायला मिळते. चंद्रकला प्रकाशनाने प्रकाशित केलेले मराठीबरोबरच इंग्रजीमध्ये असे एकत्र असलेले पुस्तक म्हणजे ‘गर्विष्ठ आंब्याचं झाडं’. स्नेहसंमेलन, गणेशोत्सव, नवरात्र तसेच विविध कारणांनी सादर करता येईल असे नाटुकले. मिलिंद बडकुंद्री यांनी ते इंग्रजीमध्ये लिहिले तर शशिकला उपाध्ये यांनी मराठी अनुवाद केला आहे. मुलांमध्ये लपलेले अभिनेते आणि कवी यांना शोधण्याचा प्रयत्न हे पुस्तक जसे करते, तसेच पर्यावरणविषयक नीतिमूल्यांची माहिती यामध्ये वाचायला मिळते.
ही आणि अशीच पर्यावरणविषयक पुस्तके पर्यावरण रक्षणाचे भान देऊ शकतात आणि उत्तम पर्यावरण हे उत्तम पर्यटनासाठी लाभदायक ठरू शकते. कारण पर्यावरण जर नीट राहिले, तर पर्यटन करण्यासाठी योग्य असा निसर्ग अबाधित राहील. पर्यटनातून मिळणाऱ्या आनंदामध्ये उत्तम पर्यावरणाचा महत्त्वाचा वाटा असतो, हे आपल्याला विसरून चालणार नाही.