उधळपट्टी व खाबुगिरी सुरूच राहिल्यास श्रीमंत पालिकेला लवकरच ‘भिकेचे डोहाळे’ Print

पिंपरी पालिका आज ‘तिशी’ ची
पिंपरी / बाळासाहेब जवळकर
आकुर्डी, भोसरी, पिंपरी, चिंचवड ग्रामपंचायती एकत्र करून १९७० मध्ये स्थापना झालेल्या िपपरी नगरपालिकेची शहरातील औद्योगिकीकरणामुळे झपाटय़ाने वाढ होत गेली आणि १२ वर्षांतच पिंपरीत महापालिका झाली. जकातीच्या भरघोस उत्पन्नामुळे आशियातील ‘श्रीमंत’ महापालिकेचा रुबाबही मिळाला. अनेक स्थित्यंतरे, अडीअडचणींवर मात करीत विकासाचा अपेक्षित पल्ला गाठण्याची किमया पालिकेने साधली आणि ३० वे वर्षे गाठले. दुसरीकडे, रग्गड पैसा असूनही नियोजनाचा अभाव, वारेमाप उधळपट्टी आणि विकासाच्या नावाखाली खाबुगिरीच्या उद्योगामुळे याच श्रीमंत शहराला ‘भिकेचे डोहाळे’ लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई परप्रांतियांच्या लोंढय़ामुळे बेजार झाली तर चोहोबाजूने वाढ झाल्याने पुणे ‘पॅक’ होऊ लागले. विकासकामांमुळे ‘चकचकीत’ झालेले िपपरी-चिंचवड शहर बाहेरच्या नागरिकांना आता खुणावू लागले आहे. सद्यस्थितीत शहराने १७ लाख लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या ‘श्रीमंत’ महापालिकेचा गुरुवारी ३० वा वर्धापनदिन साजरा होत असताना काही गोष्टींचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ सर्वावरच आली आहे.
केंद्र सरकारच्या जेएनयूआरएम अभियानातील प्रकल्पांसाठी मिळालेल्या निधीसह िपपरी महापालिकेचे २८०० कोटींचे अंदाजपत्रक आहे. पैशाच्या उपलब्धतेमुळे मोठ-मोठे प्रकल्प राबवत असताना पालिकेचे प्राथमिक सुविधांकडे दुर्लक्ष होत असून इतक्या वर्षांनंतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. विकासाच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रचंड तक्रारीही तितक्याच गंभीर आहेत. घोषणा होते मात्र, कार्यवाही होत नाही. २४ तास पाणी देण्याची घोषणा करून त्यासाठी पाण्याचे मीटर बसविण्याची सक्ती पालिकेने केली. प्रत्यक्षात २४ तास पाणीपुरवठा झालाच नाही. वाढीव पाणीपट्टीची बिले, विस्कळीत व दूषित पाणीपुरवठय़ाने नागरिक वैतागले आहेत.
रस्ते-विकासाच्या कामांना प्राधान्य देत िपपरी पालिकेने पुणे-मुंबई, औंध-रावेतसह प्रमुख रस्त्यांसाठी अब्जावधी रुपयांचा खर्च चालविला आहे. मात्र, अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. अनेक भागात वहिवाटीसाठी रस्ते उपलब्ध नाहीत. रुंदीकरणाची कामे घाईने करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही वेळेत न केल्याने पुन्हा अतिक्रमणे झाली. स्वच्छतेची पारितोषिके नावालाच असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे.
पालिका रुग्णालयातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडते व रुग्णांची हेळसांड होते. खासगी रुग्णालयांकडून मिळणाऱ्या कमिशनसाठी सर्वसामान्य रुग्णांना लुटण्याचे घाणेरडे राजकारण डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उघडपणे सुरू आहे. पालिका शाळांमध्ये शिक्षणाचा पुरता बोजवारा उडाला आहे. साहित्य खरेदीतून मिळणाऱ्या टक्केवारीचा विचार शिक्षण मंडळात होतो.
केंद्र सरकारच्या ‘जेएनयूआरएम’ अभियानात पिंपरी-चिंचवडला ‘बेस्ट सिटी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रशस्त रस्ते, मोठे निवासी प्रकल्प, मॉल, उंची हॉटेल्स, मल्टीप्लेक्स आदींमुळे शहराचा कायापालट होत असल्याचे चित्र पुढे आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते व वाहतूक, झोपडपट्टी सुधारणा, घरकुल योजना असे कोटय़वधींचे प्रकल्प शहरात होत आहेत. नाशिकफाटा येथे राज्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल, चिंचवड स्टेशनचे सिटी सेंटर, सायन्स पार्क, मोशीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रदर्शन केंद्र असे मोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. यातील बहुतांश प्रकल्प वादात अडकले असून कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अशा परिस्थितीत वर्धापनदिनाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याची गरज असून उधळपट्टी व खाबुगिरी बंद न केल्यास शहराचे भवितव्य अंधारमय होईल, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.