धायरी, बिबवेवाडीत कारवाई; इमारती, शेडचे बांधकाम पाडले Print

पुणे / प्रतिनिधी
बेकायदा बांधकामांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या कारवाईत गुरुवारी वडगाव धायरी आणि बिबवेवाडी येथील ३४ हजार ९०० चौरसफूट बांधकाम व शेड पाडण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांकडून मोठय़ा प्रमाणात विरोध झाल्यानंतरही ११ ठिकाणची कारवाई पूर्ण करण्यात आली.
महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता राजेंद्र राऊत आणि विशाल हरिभक्त यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत वडगाव धायरीतील पक्क्या बांधकामांसह धनकवडीतील अनधिकृत शेडही पाडण्यात आल्या. वडगाव धायरी भागातील सर्वेक्षण क्रमांक १४६, १४५, ५०/९ येथील तीन इमारती पाडण्यात आल्या. नऊ हजार शंभर चौरसफूट बांधकाम पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बिबवेवाडी सर्वेक्षण क्रमांक ६५६, ६५७ येथील आठ औद्योगिक शेडवरदेखील कारवाई करण्यात आली. सरासरी दोन ते सहा हजार चौरसफूट एवढे बांधकाम येथे करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर नागरिकांनी विरोध केला. मात्र, कारवाईच्या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तामध्ये ही कारवाई पूर्ण करण्यात आली.