पिंपरी मतदारसंघावरून सर्वच पक्षात ‘रणकंदन’ Print

महायुतीत सर्वाधिक तणाव; गोपीनाथ मुंडे यांनाच शह?  
पिंपरी / बाळासाहेब जवळकर
विधानसभा निवडणुकांना बराच वेळ असूनही पिंपरी मतदारसंघावरून राजकीय डावपेचांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पिंपरी-भोसरी मतदारसंघ अदलाबदली करण्याच्या वादग्रस्त विषयावर चर्चा झाली. भाजपकडील पिंपरी शिवसेनेला देऊन त्यांच्याकडील भोसरी मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप शहराध्यक्षच आग्रही असून शिवसेना व गोपीनाथ मुंडे समर्थकांना हादरा देण्याचा दुहेरी डाव त्यामागे आहे. पिंपरीसाठी रिपाइंची प्रतिष्ठा लागणार असून राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ खेचण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच फिल्डिंग लावल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.
लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागताच विधानसभा निवडणुकांचे आडाखे मांडले जाऊ लागले  आहेत. पिंपरीत सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीच्या जागावाटपात शहरातील तीनपैकी चिंचवड व भोसरी शिवसेनेकडे तर पिंपरी मतदारसंघ भाजपकडे आहे. नव्याने झालेल्या महायुतीत रिपब्लिकन (आठवले गट) सहभागी झाला आहे. त्यामुळे मतदारसंघ वाटपात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप-सेनेतील मुख्य घडामोडींचा केंद्रिबदू पिंपरी मतदारसंघ राहणार आहे. गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पुण्यात सदस्यनोंदणी व सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधी आंदोलनासाठी बैठक झाली. मात्र, तेथे मतदारसंघांच्या अदलाबदलीवर चर्चा झाली. शहराध्यक्ष एकनाथ पवार व त्यांचे समर्थक पिंपरीऐवजी भोसरी मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी आग्रही आहेत. मुंडे यांचे निष्ठावान अमर साबळे मागील वेळी पिंपरीतून अण्णा बनसोडे यांच्याकडून पराभूत झाले. युतीच्याच नेत्यांनी त्यांना घरी बसवले. आता नव्या दमाने त्यांनी मतदारसंघाची बांधणी सुरू केली असताना व मुंडे यांच्याकडे पक्षाचे नेतेपद आले असतानाही तो मतदारसंघ दुसऱ्याला देऊन त्यांना धक्का देण्याचे डावपेच गडकरी समर्थकांकडून सुरू आहेत. त्यात रिपाइंचा डोळा याच मतदारसंघावर आहे. शिवसेनेच्या भोसरीतील पराभूत उमेदवार सुलभा उबाळे यांच्यावर कुरघोडी करण्याची भाजपची खेळी आहे. उबाळे यांच्या पराभवात एकनाथ पवार समर्थकांचा ‘हातभार’ होता. त्यावरून निर्माण झालेला ताणतणाव पालिका निवडणुकीत युती तोडण्यापर्यंत वाढला होता. आता पुन्हा भोसरी आमचा बालेकिल्ला असल्याचे सांगत भाजपने शिवसेनेची खोड काढली आहे. रिपाइंकडून पक्षाच्या एकमेव नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे प्रबळ दावेदार आहेत.
मागील निवडणुकीत त्यांनी मिळवलेली लक्षणीय मते पाहता रामदास आठवले या मतदारसंघाचा विषय प्रतिष्ठेचा करतील, असेच दिसते. राष्ट्रवादीचा आमदार असला तरी हा आपलाच हक्काचा मतदारसंघ असल्याची काँग्रेसची भावना आहे. त्यावर पुन्हा कब्जा मिळवण्यासाठी काँग्रेस शिलेदार सरसावले आहेत. मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली एका गटाकडून सुरू असलेली मोर्चेबांधणी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच आहे. या सर्व घडामोडी पाहता िपपरी मतदारसंघावरून राजकीय रणकंदन होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.