विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांबाबत अध्यक्षच उदासीन! Print

पुणे / प्रतिनिधी
पुणे विद्यापीठातील २४ तदर्थ अभ्यास मंडळांची वर्षभरात एकही बैठक झाली नसून यातील बहुतेक अभ्यासमंडळांची बैठक ही अध्यक्षांनी बोलावलीच नसल्यामुळे झालेली नाही. याबाबत अधिसभेचे सदस्य डॉ. विठ्ठलसिंह ढाकरे यांनी विद्यापीठाला प्रश्न विचारला आहे.
पुणे विद्यापीठामध्ये विविध विषयांची एकूण ६९ अभ्यास मंडळे आहेत. त्यापैकी तब्बल २४ अभ्यास मंडळांची वर्षभरात एकही बैठक झालेली नाही. अभ्यासक्रम तयार करणे, त्यामध्ये बदल करणे, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढणे, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्पांचे आयोजन करणे अशा जबाबदाऱ्या अभ्यास मंडळांवर असतात. परंतु विद्यापीठातील बहुतांश अभ्यास मंडळे नावापुरतीच स्थापन झाल्याचे चित्र आहे. मेटलर्जी, फार्मास्युटिकल, फार्माकोग्नॉसी, फार्माकोलॉजी, बायोकेमेस्ट्री, होम सायन्स, बेसिक मेडिकल सायन्स, दलित स्टडीज, ग्रंथालय व माहितीशास्त्र, फॅशन डिझाईन, सिंधी या अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांनी वर्षभरात एकही बैठक बोलवलेली नाही. तर, शारीरिक शिक्षण व अध्यापन, शारीरिक शिक्षण व क्रीडा शास्त्र, व्यावसायिक, आंतरशास्त्र प्रणाली, डिझास्टर मॅनेजमेंट, डिफेन्स रिलेटेड टेक्नॉलॉजी, बायोइन्फॉरमॅटिक्स, हेल्थ सायन्स या विषयांची अभ्यास मंडळे अजूनही कागदावरच आहेत.