कर्वेनगर येथील अपघातात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक Print

पुणे / प्रतिनिधी
कर्वेनगर येथे मृत्युंजय मंदिराजवळ रस्त्यावर टाकलेल्या चिखलामुळे अपघात होऊन तरुणीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बीएसएनएलच्या ठेकेदारासह बसचालकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. बीएसएनएलचा ठेकेदार महेंद्र पाटील (वय २८) आणि बसचालक शिवनाथ वाघमोडे (वय ३६, रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत प्रियंका सुनील शेटे (वय २०, रा. शिवामृतकृपा सोसायटी, कर्वेनगर) या तरुणीचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका ही दुचाकीवरून कर्वेनगरकडे जात होती. बीएसएनएलच्या भूमिगत पाईपलाईनमध्ये पावसामुळे शिरलेला चिखल काढून टाकण्याचे काम गुरुवारी सकाळपासून सुरू होते. हा चिखल काढून रस्त्याच्या कडेलाच टाकण्यात आला होता.
प्रियंका ही गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास या चिखलावरून घसरून खाली पडली. त्यावेळी पाठीमागून येत असलेल्या मिनी बसचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. उपचारांसाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी जबाबदार असलेल्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.