खोटी पदे दाखवून मानधन लाटणाऱ्या प्राचार्यावर होणार चर्चा Print

विद्यापीठाची आज अधिसभा
पुणे / प्रतिनिधी
विद्यापीठाची २०१२ मधील दुसरी अधिसभा शनिवारी (१३ ऑक्टोबर) होणार असून, विद्यापीठाच्या परीक्षांच्या दरम्यान लासलगाव येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानीच कस्टोडियन व वरिष्ठ पर्यवेक्षक ही पदे खोटी दाखवून या पदांसाठी देण्यात येणारे साधारण पन्नास हजार रुपये मानधन घेतले असून अधिसभेमध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अधिसभेप्रमाणे या अधिसभेतही विद्यापीठाचा परीक्षा विभाग गाजणार आहे.
नियमानुसार विद्यापीठांच्या परीक्षांच्या वेळी महाविद्यालयात प्राचार्य, कस्टोडियन आणि वरिष्ठ पर्यवेक्षक या पदांवर स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करावी लागते. या तीनही पदांसाठी विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे मानधन दिले जाते. मात्र, लासलगाव येथील महाविद्यालयातील प्राचार्यानी त्यांना मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त कस्टोडियन आणि वरिष्ठ पर्यवेक्षक या पदांचे मानधनही खोटी पदे दाखवून लाटले आहे. याबाबत पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य डॉ. मिलिंद वाघ यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाला प्रश्न विचारला आहे. या प्राचार्याकडून पन्नास हजार रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. त्याचप्रमाणे या प्राचार्यावर कारवाई करण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
दरवेळ प्रमाणे ही अधिसभाही विद्यापीठाचा परीक्षा विभाग गाजवणार असल्याचे दिसून येत आहे. निकालांमधील चुका, निकाल उशिरा लागणे, परीक्षेदरम्यानचे आणि निकालावेळचे गैरप्रकार, अशा विविध मुद्दय़ांवर गेल्या अधिसभेमध्ये सदस्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाला धारेवर धरले होते. या अधिसभेतही विद्यापीठाचा परीक्षा विभाग गाजणार आहे. परीक्षा विभागाने या वर्षीपासून राबवलेली परीक्षा अर्ज भरण्याची ऑनलाईन अर्जप्रणाली या वेळी सदस्यांच्या निशाण्यावर आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील पायाभूत सुविधा, विद्यापीठाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, उपकुलगुरूंची नियुक्ती अशा विविध मुद्दय़ांवरही विद्यापीठाला प्रश्न विचारण्यात आले आहेत.     
कुलगुरूंची पहिली अधिसभा
आतापर्यंत सदस्य किंवा महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक म्हणून अधिसभेमध्ये हजेरी लावणारे डॉ. वासुदेव गाडे आता कुलगुरू म्हणून अधिसभेला हजेरी लावणार आहेत. डॉ. गाडे कुलगुरू झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच अधिसभा आहे. नव्या कुलगुरूंचे स्वागत आणि अभिनंदन करणारे अनेक प्रस्ताव अधिसभा सदस्यांनी मांडले आहेत.