स्थायी समितीच्या बैठकीत पतीराजही सोबत हवेत! Print

पिंपरीतील महिला सदस्यांची अजब मागणी
पिंपरी / प्रतिनिधी
स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी विश्वासात घेत नाहीत, हिशेबात घोळ करतात, अशी महिला सदस्यांची तक्रार आहे. त्यावर ‘समाधान’ करणारा तोडगा न निघाल्याने स्थायीच्या ‘प्री’ बैठकीत पतीराजांना बसू द्यावे, अशी अजब मागणी त्यांनी शेट्टी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे स्थायीच्या कारभाराला वेगळेच ‘वळण’ मिळण्याची चिन्हे आहेत.
स्थायी समितीच्या अर्थपूर्ण व्यवहारामध्ये आमच्यावर अन्याय होतो. कोणते विषय येतात व मंजूर होतात याची माहिती मिळत नाही. एखादा विषय का तहकूब ठेवला जातो व तोच विषय पुढे अचानक मंजूर का होतो, काही कळतच नाही, अशी महिला सदस्यांची व्यथा आहे. त्यामुळे स्थायी समितीत महिला सदस्यांनी असहकार पुकारला आहे. त्याचाच परिणाम म्हणून स्थायीच्या दोन बैठका तहकूब कराव्या लागल्या. शेट्टी यांनी महिलांचा हा ‘गैरसमज’ दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आपल्या आरोपावर ठाम आहेत. हिशेबाच्या या वादामुळे अधिकारी व ठेकेदारही वैतागले असून पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याची ओरड करू लागले आहेत.
या अजब समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न बऱ्याचदा झाला. मात्र, त्यात अद्याप तरी यश आले नाही. गोड बोलून शेट्टी आमची फसवणूक करतात. पतीराज कामांची, फाईलींची चौकशी करतात. ‘ती’ कामे अपेक्षेप्रमाणे न झाल्यास रागराग करतात, अशी त्यांची अडचण आहे. त्यामुळे स्थायी समितीची मूळ बैठक सुरू होण्यापूर्वी निर्णय होणारी जी गुप्त बैठक असते, त्यामध्ये पतीराजांना बसू द्यावे.
त्यांना सर्व विषयांची व त्याच्या खर्चाची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जावी आणि मुख्य म्हणजे हिशेबाचे काम पाहू द्यावे, असा त्यांचा सूर आहे. काही पतीराजांचे वाढीव प्रताप सर्वश्रुत असल्याने अशा कल्पनेनेच अनेकांचे धाबे दणाणले आहे.