पालिकेच्या ‘हेरिटेज वॉक’चे घटस्थापनेला होणार उद्घाटन Print

पुणे/प्रतिनिधी
पुण्यातील प्राचीन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वास्तूंची ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी महापालिकेतर्फे शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा दरम्यान ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम सुरू केला जात असून, त्याचा उद्घाटन समारंभ घटस्थापनेच्या दिवशी (मंगळवार, १६ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आला आहे.
महापौर वैशाली बनकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्री कसबा गणपती, शनिवारवाडा, लाल महाल, विश्रामबागवाडा, नानावाडा, महात्मा फुले मंडई यासह पुण्यात ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या अडीचशेहून अधिक वास्तू आहेत.
या वास्तूंचे महत्त्व आणि हा सांस्कृतिक ठेवा जपण्याबरोबरच त्यांची माहिती पुणेकरांना तसेच पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना व्हावी या हेतूने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम सुरू केला जात असल्याचे महापौर म्हणाल्या. महापालिकेजवळील शिवाजी पुलापासून दर शनिवारी आणि रविवारी सकाळी साडेसात वाजता त्याची सुरुवात होईल. सुमारे अडीच किलोमीटरचा पायी फेरफटका मारून सकाळी साडेनऊ वाजता विश्रामबागवाडा येथे या पायी फेरीची सांगता होईल.
या फेरीसाठी निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाचा इतिहास व वर्तमान यांची माहिती प्रशिक्षित, तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून दिली जाणार आहे. शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवारवाडा, लाल महाल, श्री कसबा गणपती, नानावाडा, नगर वाचन मंदिर, बेलबाग, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग आणि तुळशीबागेतील श्री राम मंदिर या क्रमाने ही ठिकाणे दाखवून ही पायी फेरी विश्रामबागवाडय़ात संपेल. या वेळी पर्यटकांसमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जातील.
ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण, जतन, प्रकाशव्यवस्था आदी अनुषंगिक कामेही करण्यात येत असून संपूर्ण परिसर आगळावेगळा व दर्शनीय होईल, याचीही काळजी घेतली जात आहे. हा उपक्रम सशुल्क असून पायी फेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे शुल्क तीनशे रुपये असेल. तसेच शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना सवलत असून दोनशे रुपये शुल्क भरून फक्त फेरीतही सहभागी होता येणार आहे. महापालिकेकडे पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने हे काम जनवाणी या संस्थेला देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम चालविण्याची जबाबदारी या संस्थेवर देण्यात आली आहे.