विवेक आणि क्षमता हाच ‘गॉडफादर’ - तावडे Print

पुणे / प्रतिनिधी
‘‘ शिवाजी महाराज आणि गुरू गोविंदसिंग या दोन्ही महापुरुषांच्या चरित्रांत खूप साम्य आहे. या दोघांनाही कुणी ‘गॉडफादर’ नव्हता. आपला गॉडफादर आपला विवेक आणि क्षमता हाच असतो, हे आजच्या पिढीला सांगण्यासाठी या महापुरुषांची चरित्रे पथदर्शक आहेत.’’ असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी लिहिलेल्या ‘दशमेश’ या गुरू गोविंदसिंग यांच्या चरित्राचे तावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, संतसिंग मोखा, चरणजितसिंग सहानी, हरमिंदरसिंग घई, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष विकास मठकरी, आमदार भीमराव तापकीर, युवराज शहा या वेळी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘‘के. एस. ब्रार यांच्यावरील हल्ल्यानंतर पुन्हा खलिस्तानवादी चळवळीची ठिणगी पडेल अशी कुणाची इच्छा असेल, तर ती पूर्ण होऊ देता कामा नये. आपण सीमेवरील दहशतवाद आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो आहोत. पण विदर्भ, मराठवाडय़ातील लहान खेडय़ांपर्यंतही दहशतवाद पोहोचला आहे. कट्टर धार्मिक युवकांना निवडून त्यांच्या गरिबीचा फायदा उठवत त्यांना आपल्यात सामील करून घेण्यात दहशतवादी यशस्वी होत आहेत. ही आव्हाने खूप मोठी आहेत. ‘दहशतवादी विरुद्ध देशवासीय’ असा हा लढा आहे. त्यामुळे समाजाने सतर्क राहायला हवे.’’
‘बॉम्बस्फोटासारख्या घटना घडल्यावर त्या ठिकाणी पुढचे बारा तास ‘व्हीआयपी’ व्यक्तींनी फिरकू नये, जेणे करून घटनेच्या तपासात व्यत्यय येणार नाही. सर्वच राजकीय पक्षांनी हा नियम पाळावा’, असेही तावडे यांनी सांगितले. पोळ म्हणाले, ‘‘गुरू गोविंदसिंग यांचा जन्म आसामात झाला, त्यांचे कर्तृत्व पंजाबात घडले आणि महाराष्ट्रात त्यांनी आपले अखेरचे दिवस व्यतीत केले. त्यामुळे शीख समाजाचे या तीनही राज्यांशी विशेष नाते आहे.’’