महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत वाईट- देशपांडे Print

पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय वाईट आहे. मात्र याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, असे मत ‘बंगलोरच्या इन्स्टिटय़ूट फॉर सोशल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक चेंज’ या संस्थेचे संचालक व शेतितज्ज्ञ डॉ. राम देशपांडे यांनी व्यक्त केले.
गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सच्या वतीने पद्मभूषण डॉ. पी. आर. दुभाषी पब्लिक लेक्चरमध्ये ‘द फ्युचर ऑफ इंडियन अ‍ॅग्रिकल्चर’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी डॉ. दुभाषी, महाविद्यालयाचे प्राचार्य राजस परचुरे आदी उपस्थित होते.  डॉ. देशपांडे म्हणाले, महाराष्ट्रासाठी जी कृषी धोरणे जाहीर केली जातात ती धोरणे फारशी गंभीरपणे घेतली जात नाहीत. आपल्याकडे कृषितज्ज्ञांना कमी स्थान आहे. यासाठी त्यांनी कर्नाटकचे उदाहरण दिले. कर्नाटकात कृषीविषयक कोणतीही समस्या निर्माण झाली तर त्यावर तातडीने एक तज्ज्ञांची समिती तयार केली जाते आणि समितीने सुचविलेल्या सुधारणांचा लगेच अवलंब केला जातो. काही राज्ये सोडता महाराष्ट्रासह बहुतांश राज्यांत तज्ज्ञांच्या मतांचा योग्य वापर केला जात नाही.